- केशव पवार
सावखेडा : गंगापूर तालुक्यातील तळपिंप्रीत ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या शिपायाची पत्नी सरपंचपदी विराजमान झाली आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना आशाबाई मनोहर यांनी बाजी मारत गावगाडा आपल्या ताब्यात घेतल्याने सर्व नागरिक अचंबित झाले.
तळपिंप्री, हसुर्ली, नागपूर, औरंगपूर ही ९ सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून लक्ष्मण मनोहर हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांची पत्नी आशाबाई मनोहर यांनी वॉर्ड क्रमांक एकमधून अर्ज भरला होता. निवडणुकीच्या रिंगणात आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत त्या सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या.
या ग्रामपंचायतीच्या आखाड्यात तळपिंप्रीत ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यामुळे आशाबाई मनोहर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत थेट सरपंच पदापर्यंतचा प्रवास यशस्वी पार केला. मंगळवारी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ६ विरुद्ध ३ अशा मताने पराभव करत बाजी मारली.
आशाबाई मनोहर यांना कुठलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी पहिलीच निवडणूक लढवूत सरपंचपद मिळवले. त्यांच्या या निवडीमुळे गावासह परिसरातील नागरिक अचंबित झाले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण आशाबाईंचे पती लक्ष्मण मनोहर हे याच ग्रामपंचायतीत गेल्या २० वर्षांपासून शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांची पत्नी गावकारभारीण झाली असून आगामी काळात त्या कसा कारभार हाकतात याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
आशाबाई मनोहर सरपंच, तर उपसरपंचपदी संगीताबाई दत्तात्रय दुबिले यांची निवड झाली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून पी. व्ही. गावंडे होते. ग्रामसेवक आबासाहेब कुंजर, ग्रा.पं. सदस्य दगडू पाटील निकम, माजी चेअरमन बाबासाहेब सुकासे, बाबासाहेब पुरी, अजय सुकासे, कडुबाई लोणकर, राधाबाई दुबिले, राजू मनोहर, ताराचंद दुबिले आदी उपस्थित होते.