- प्रवीण जंजाळकन्नड : कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांना सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या गावात संजना यांनाच भरभरून मते मिळाल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव या विजयी झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या गावांमध्ये जाधव यांना, तर विरोधी उमेदवारांना किती मते मिळाली याची उत्सुकता मतदारांना आहे. या अनुषंगाने माहिती घेतली असता महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गावात संजना जाधव यांना भरघोस मते मिळाल्याचे दिसून आले. उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या नागद गावात त्यांना फक्त १५७ मतांची आघाडी मिळाली आहे. राजपूत यांना १ हजार १७६, तर संजना जाधव यांना १ हजार १९ मते मिळाली आहेत. तर हर्षवर्धन जाधव ४१२ मते मिळाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष कोल्हे हे महायुतीच्या प्रचारापासून दूर होते. त्यांच्या करंजखेड या गावात संजना जाधव यांना १ हजार ८४८ मते मिळाली, तर उदयसिंग राजपूत यांना १ हजार ३९४ मते मिळाली. हर्षवर्धन जाधव ७८६ मते मिळाली.
संजना जाधव व हर्षवर्धन जाधव यांच्या पिशोर गावात ११ हजार २८० मतांपैकी संजना यांना हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा १४६ मते जास्तीची मिळाली. संजना जाधव यांना ४ हजार २६७, हर्षवर्धन जाधव यांना ४ हजार १२१, तर उदयसिंग राजपूत यांना २ हजार ९२ मते मिळाली आहेत. कन्नड शहरातील आपल्या होम ग्राऊंडवर अपक्ष मनोज पवार व वंचित बहुजन आघाडीचे अयाज शहा यांना मतदारांनी चौथ्या व पाचव्या क्रमांकावर लोटले. कन्नड शहरातसुद्धा प्रथम क्रमांकाची मते संजना जाधव यांना मिळाली. शहरात झालेल्या २३ हजार ८२ मतांपैकी संजना जाधव यांना ७ हजार ५०४, उदयसिंग राजपूत यांना पाच हजार ४७८, तर हर्षवर्धन जाधव यांना ४ हजार ५५२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अयास शहा यांना २ हजार ५९४ मते मिळाली. अपक्ष मनोज पवार यांना १ हजार ३११ मतांवर समाधान मानावे लागले.
१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्तकन्नड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक १६ उमेदवारांनी लढविली. त्यातील शिंदेसेनेच्या विजयी उमेदवार संजना जाधव, दुसऱ्या क्रमांकाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि तिसऱ्या क्रमांकावरील उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत या तीन उमेदवारांव्यतिरिक्त इतर १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये वंचित आघाडी व मनसे या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.