आडूळ ( औरंगाबाद) : किरकोळ भांडणातून रागाच्या भरात पत्नीने मध्यरात्री थेट पोलीस ठाणे गाठले. तर इकडे घाबरलेल्या शिक्षक पतीने शाळा गाठून एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कचनेर तांडा येथे आज सकाळी उघडकीस आली आहे.
पुंडलिक भागवत जगताप ( ४० रा.जटवाडा, औरंगाबाद ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पोलिस सूञांकडून मिळालेल्या माहितीनुसार कचनेर तांडा नं ६ येथील धारेश्वर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेत पुंडलीक जगताप शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जगताप यांचे पत्नीसोबत काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू आहेत. अनेकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करुन दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शुक्रवारी पुंडलीक जगताप आश्रम शाळेतून नेहमीप्रमाणे जटवाडा येथील घरी गेले. परंतु मध्यराञी २ वाजता पतीपत्नीमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. रागाच्या बारात पत्नी मध्यरात्री बेगमपूरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली. याची माहिती मिळताच बदनामीच्या भीतीने जगतापने दुचाकीवरून थेट कचनेर तांडा येथील आश्रम शाळा गाठली. काही कळायच्या आत त्यांनी एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी विद्यार्थ्यांनी हे दृश्य दिसल्याने गोंधळ उडाला. त्यांच्या गोंधळाने शेजाऱ्यांनी शाळेत धाव घेतली. माहिती मिळताच चिकलठाणा येथील पोलिस निरीक्षक देवीदास गात, सहाय्यक फौजदार द्यानेश्वर करंगळे, प्रकाश शिंदे आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुढील कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. शिक्षक पुंडलिक जगताप हे विद्यार्थी प्रिय, शांत स्वभावाचे म्हणून सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची तूर्तास चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे