लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : खाजगी वाहतूक करणा-या बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील तिरंगा चौकालगत बजाज विहार गेटसमोर घडली. सविता सोन्ने असे मृत महिलेचे नाव आहे. हे दाम्पत्य एका लग्न समारंभासाठी जात होते.समाधान काशीनाथ सोन्ने (३६, रा. बोरगाव जहागीर, भोकरदन, जि. जालना ह.मु. जयभवानी चौक, बजाजनगर) हे पत्नी सविता (३२) व दोन मुलांसह एक-दीड वर्षापासून बजाजनगरात राहत असून, एका खाजगी हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. रविवारी सकाळी ९ वाजता पती-पत्नी बजाजनगर येथून दुचाकी (क्रमांक एचएच - २०, डीयू - ६१४९) वर बसून फुलंब्री तालुक्यात एका नातेवाईकाच्या लग्नाला जात होते. पंढरपूर येथील तिरंगा चौकालगत असलेल्या बजाज विहार गेटसमोर रांजणगावकडे जाणा-या खाजगी वाहतूक करणा-या बसने (क्रमांक एचएच - २०, सीटी - ८९९८) अचानक वळण घेऊन सोन्ने यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात सविता सोन्ने बसच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाल्या. समाधान सोन्ने बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या छाती, हात-पाय व डोक्याला जबर मार लागला. जखमींना १०८ अॅम्ब्युलन्समध्ये डॉ. अमोल कोलते व चालक बोडखे यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सविता सोन्ने यांना मृत घोषित केले. जखमी समाधानवर उपचार सुरू आहेत. दाम्पत्याला १२ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा आहे.
दाम्पत्याला बसची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:41 AM