औरंगाबाद: घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्यानंतर औरंगाबादेत पळून आलेल्या आरोपीला क्र ांतीचौक पोलिसांनी बुधवारी रात्री गस्तीदरम्यान अटक केली. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे.
अतिष कोंडीराम काळे (२६,रा. बालाजीनगर, भोसरी, पुणे)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, डी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ आणि कर्मचारी मंगळवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी पुणे येथे एका महिलेचा खून करून एक जण औरंगाबादेत आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पथकाने लगेच आरोपीचा शोध सुरू केला तेव्हा बसस्थानक परिसरात अतिष पोलिसांना संशयितरित्या बसलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तेव्हा सुरवातीला तो उडवा,उडवीची उत्तरे देऊ लागला.
पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता सांगितला. शिवाय १४ आॅक्टोबर रोजी भोसरी येथील गुळवे वस्ती येथे त्याने घरगुती वादातून दारूच्या नशेत पत्नी कावेरच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली दिली. अटकेच्या भितीपोटी पळून आल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे सहायक निरीक्षक सुर्यतळ यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुर्यतळ, कर्मचारी नसीम खान, सय्यद सलीम, चंद्रकांत पोटे, राजेश फिरंगे, राजेश चव्हाण, संतोष रेड्डी ,मंगेश मनोरे आणि हणमंत चाळणेवाड, देवानंद मरसाळे यांनी केली.