वाळूज महानगर (औरंगाबाद ) : भांडण झाल्यानंतर आईसोबत माहेरी जाणाऱ्या पत्नीला मारहाण करुन पतीने आपल्या तीन महिण्याच्या चिमुकल्याचे अहपरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. बाळाच्या विरहाने हतबल झालेल्या मातेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपबिती कथन केली. पोलीस भरपावसात आरोपी पित्याचा शोध घेत आहेत.
अपर्णा गाडेकर (रा. डोंगरगण, ता. जि. अहमदनगर) हिने दोन वर्षांपूर्वी गावातील संदीप दिलीप कदम याच्या सोबत प्रेमविवाह केला होता. या दोघांचा सुखात संसार सुरु असताना पती संदीप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा निघाला आणि त्याने पत्नी अपर्णा हिचा छळ सुरु केला. तीन महिन्यांपूर्वी २७ मे रोजी अपर्णाने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्यानंतर आनंदीत झालेल्या संदीपने दोन महिन्यांपूर्वी पत्नी अपर्णा व बाळाला सोबत घेऊन वाळूज एमआयडीसीत रोजगाराच्या शोधात आला. मात्र, काही दिवसांपासून संदीपने पत्नीला पुन्हा मारहाण करुन त्रास देण्यास सुरवात केली. यामुळे अपर्णाने आईला बोलावून घेतले. आज सकाळी सासूने संदीपला समजावून सांगितले. परंतु, तो अरेरावी करू लागला. यामुळे अपर्णा बाळाला घेऊन आईसह माहेरी निघाली.
पत्नी माहेरी जात असल्याने संतप्त झालेल्या संदीपने रिक्षाचा पाठलाग करुन रांजणगाव फाट्यावर रिक्षा आडवली. पत्नी व सासुसोबत झटापट करुन चिमुकल्या मुलाला हिसकावून तो पळून गेला. अपर्णा हिने आईला सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून घडलेली घटना कथन केली. या प्रकरणाची माहिती पोलिस बंदोबस्तासाठी शहरात गेलेल्या पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळताच त्यांनी तात्काळ संदीपचा शोध घेण्याचे आदेश बजावले. उपनिरीक्षक निर्वळ यांनी अपर्णा व तिची आई सुजाता यांना सोबत घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने भरपावसात वाळूज औद्योगिक परिसर पिंजून काढला. दरम्यान, संदीपने फोनवर बाळ दुध पितानाचे फोटो पाठवून फोन बंद केला.