औरंगाबाद : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन साडीने तिचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.मयत रुपालीचा भाऊ भागीनाथ विष्णू चव्हाण (रा. जाधववाडी) यांनी कैलास ऊर्फ कल्याण पवार (३०, रा. नारेगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार रुपालीचे २००५ मध्ये कैलास ऊर्फ कल्याण पवारबरोबर लग्न झाले होते. २००५ ते २००९ पर्यंत रुपाली नवऱ्यासोबत नांदगाव, (जि. नाशिक) येथे राहिली. त्यानंतर २००९ ला ते दोघे औरंगाबादला आले. कैलास हा एका कंपनीच्या कँटीनमध्ये नोकरी करीत होता, तर रुपाली एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीला लागली. कैलास हा नेहमी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे, एकदा त्याने तिला मारहाण करून माहेरी पाठवून दिले होते. रुपाली आणि कैलास पवार हे दिलीप चोरमले यांच्या घरात भाड्याने राहत होते. घटनेच्या दिवशी १० आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री दिलीप चोरमले कंपनीत जायला निघाला. त्यावेळी कैलास घराबाहेर रस्त्यावर उभा होता.रुपालीला कामावर जायचे असल्यामुळे तिला उठवावे म्हणून त्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, परंतु ती काही उठली नाही. म्हणून घरात जाऊन पाहिले असता तिच्या तोंडातून फेस येत होता, ती काहीही हालचाल करीत नव्हती. यावरून चोरमले यांनी तिच्या नातेवाईकांना, पोलिसांना माहिती दिली. तपासात रुपालीचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील के. एन. पवार यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.
पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2016 12:34 AM