वाळूज महानगर (औरंगाबाद): वाळूजला चार महिन्यांपूर्वी स्वयंपाकघरात पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात वाळूज पोलिसांना गुरुवारी यश आले. आजारी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने सासूच्या मदतीने घरात मृतदेह पुरल्याची धक्कादायक कबुली पती काकासाहेब भुईगड याने दिली आहे.
वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत शेळके यांच्या घरात ७ महिन्यांपूर्वी काकासाहेब नामदेव भुईगड (४७, रा. धानोरा, ता. फुलंब्री) हा पत्नी अनिता (३५), मुलगी व सासू कडूबाई यांच्यासह किरायाने राहत होता. नवरात्रात भुईगड घरमालकास गावी धानोरा येथे जात असल्याचे सांगून कुटुंबीयांसह निघून गेला. शेळके एक महिन्याच्या भाड्यासाठी भुईगडशी सतत संपर्क साधत होते. मात्र तो भाडे देत नसल्याने व फोनही बंद असल्याने शेळके यांनी कुलूप तोडले. स्वयंपाकघरातील ओट्याखाली पुरून ठेवलेला, एका चादरीत मिठात गुंडाळलेला, कुजलेला सांगाडा दिसल्याने शेळके यांनी वाळूज पोलिसांना कळवले.
पंढरपुरात संशयित पती ताब्यातवाळूज पोलिसांनी भुईगडच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, सहा. निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, संदीप शेवाळे, सायबर सेलचे पोकॉ. संदीप पाटील यांनी गुरुवारी दुपारी पंढरपुरात राहत असलेल्या भुईगडसह मुलगी व सासूस पोलिस ठाण्यात आणले.
अवघ्या २४ तासांत उलगडाचौकशीत भुईगडने पत्नी सतत आजारी असल्याने आजारपणात २२ ऑगस्टला तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने सासूच्या मदतीने घरातच मृतदेह पुरल्याची कबुली दिली. दुर्गंधी पसरू नये, यासाठी मिठात शव चादरीत टाकून खड्डा खोदून पुरल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, मृतदेह घरात पुरल्यानंतर महिनाभर बाकीचे कुटुंब तेथेच राहिले. भुईगडचे यापूर्वी दोन विवाह झालेले असून दोन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. यानंतर त्याने अनितासोबत तिसरे लग्न केले होते. अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचे रहस्य वाळूज पोलिसांनी उलगडल्याने पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त अशोक थोरात यांनी वाळूज पोलिसांचे कौतुक केले.
बनावासाठी ओट्यावर शेंदूर लावलेले दगडघरमालक व शेजाऱ्यांना संशय येऊ नये, यासाठी भुईगडने मृतदेह पुरलेल्या ठिकाणी ओट्यावर शेंदूर लावलेले दोन दगड ठेवले होते. अनिताचा व्हिसेरा राखून ठेवल्याने तिचा मृत्यू कसा झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले म्हणाले.