औरंगाबाद : क्षयरोगाने आजारी पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झालेल्या पतीने तासाभराने घरासमोरील लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आईचे कलेवर घरात पडलेले, बाहेर लिंबाच्या झाडाला लटकणारा वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ मुलावर आली. मुकुंदवाडी परिसरातील रामनगर, विठ्ठलनगरात शनिवारी मध्यरात्रीनंतर ही हृदयद्रावक घटना घडली.
भाऊसाहेब हिरामण गोसावी (६५) आणि विमलबाई भाऊसाहेब गोसावी (६०), असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. रामनगरात कुटुंबासह राहणारे भाऊसाहेब गोसावी हे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आणि असोसिएशन आॅफ इंजिनिअरिंग वर्कर्स संघटनेचे माजी पदाधिकारी होते. कंपनीत कार्यरत असताना त्यांनी अनेक कामगार लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होेता. निवृत्त झाल्यापासून ते विठ्ठलनगरात राहत होते. त्यांची पत्नी विमलबाई गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. त्यांचा आजार उपचाराला दाद देत नव्हता. पत्नीवर भाऊसाहेब यांचे निस्सीम प्रेम होते.
शनिवारी मध्यरात्री विमलबाई यांचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून भाऊसाहेब यांना विरह असह्य झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. त्यांना झोपेतून न उठवता भाऊसाहेब यांनी पैठण तालुक्यात गावी राहणाऱ्या पुतण्याला रात्री अडीच वाजेच्या सुमारास फोन करून विमल यांच्या निधनाचे वृत्त कळविले. यानंतर पत्नीची साडी घेऊन ते घराबाहेर आले. घराबाहेरील झाडाला साडीने बांधून त्यांनी गळफास घेतला. गावी असलेल्या त्यांच्या पुतण्याने भाऊसाहेब यांच्या मुलाला फोन करून वार्ता खरी आहे का, याची खातरजमा केली. त्यांचा मुलगा आणि अन्य नातेवाईक झोपेतून उठून खाली आले तेव्हा त्यांना आईचे घरात पडलेले कलेवर आणि वडिलांचा लटकणारा मृतदेह दिसला.
पोलिसांनी हलविला मृतदेह घाटीतहे दृश्य पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. त्यामुळे शेजारी जागे झाले. पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाऊसाहेब यांचा मृतदेह घाटीत हलविला. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक मनगटे तपास करीत आहेत.