खुलताबाद : पतीने सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणामुळे गदाणा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पत्नीला आपले सदस्यत्व गमवावे लागले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गदाना-बोरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य राजू रंगनाथ चव्हाण यांनी ॲड. शरद भागडे पाटील यांच्यामार्फत सदस्य द्वारका रोहिदास आधाने यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यात नमूद केले होते की, गदाना येथील सरकारी जमीन गट क्र. २९० मध्ये ५९५० चौरस फूट जमिनीवर अतिक्रमण केले. व त्याचा नमुना नंबर ८९६ तयार केल्याचा आरोप केला होता. यावर गटविकास अधिकारी व तहसीलदार खुलताबाद यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता.
या अहवालानुसार सुनावणीअंती जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी द्वारका रोहिदास आधाने यांनी शासकीय मिळकतीवर अतिक्रमण करून तेथे विटामाती व पत्र्याचे शेड उभारल्याचे सिद्ध होत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे सदस्यपद रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे.