- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : जंगल क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राण्यांना पाणी आणि अन्न मिळेनासे झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत सहा महिन्यांत हरिण, काळवीट, रानडुक्कर, बिबट्या व नीलगाय आदी १९ वन्यप्राण्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभाग या प्राण्याच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे सांगत असले तरी बहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद वनविभागांर्तगत नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. वनविभागात पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. असे असले तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका या प्राण्यांनाही बसला आहे. जंगलांमध्ये या प्राण्यांना अन्न व पाणी मिळत नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. यातूनच प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे. यातून मानवी हल्ल्यांमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आल्याचे काही घटनांवरुन दिसून येत आहे.
यंदा जानेवारी ते मे या कालावधीत वनक्षेत्रातील वन्यजीवांवर हल्ले किंवा अपघात झालेले तसेच नैसर्गिकरीत्या मृत झालेले वन्यजीव आढळून आले आहेत. या प्राण्याच्या मृत्यूचे पंचनामे करून स्थानिक पातळीवरून चौकशी सुरू असल्याचे वनविभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या घटनांची चौकशी सुरू झाली; पण पुढे काही झाले नाही. रोजच्या धावपळीच्या दैनंदिनीतून विरंगुळा म्हणून काही क्षण निवांत घालविण्यासाठी तारांकित वसाहत व टेकड्यांवर घरे बांधण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. यातूनच निसर्गाचा समतोल ढसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात वनक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासह वन्यजीवांचे रक्षण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
आजार किंवा इतर प्राण्यांची शिकारमुख्य वनसंरक्षक पी.के. महाजन म्हणाले की, विभागातील काही जिल्ह्यांत ज्या वन्यजीवांचे मृतदेह आढळून आले आहेत, त्यांची त्या स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यात कोणी दोषी आढळल्यास वन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. नैसर्गिक मृत्यू हा आजार अथवा शरीरातील पाणी कमी झाल्यानेही होऊ शकतो. चौकशीअंती ते समजू शकणार आहे.