शहरातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा सुरळीत राहावी, याकरिता प्रत्येक चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी शहर वाहतूक विभागाचे पोलीस वाहतूक नियमनासाठी तैनात असतात. मात्र, काही वाहनचालकांना नियम मोडण्यातच आसुरी आनंद मिळतो. वाहतूक पोलीस कामात व्यग्र असल्याचे पाहून अनेक जण कधी सिग्नल तोडून निघून जातात, तर काही जण सिग्नलचा दिवा लाल होताच पुढे उभे राहण्यासाठी डाव्या लेनवर जाऊन थांबतात. डाव्या लेनवर उभ्या असलेल्या वाहनचालकामागे एकापाठोपाठ अनेक वाहनचालक जाऊन उभे राहतात आणि सिग्नलचा दिवा हिरवा होण्याची प्रतीक्षा करताना दिसून येतात. यावेळी डाव्या बाजूकडे वळून जाणाऱ्या वाहनचालकांचा रस्ता अडविल्यामुळे कर्कश हाॅर्नचा किलकिलाट सुरू होतो. मात्र, एकाही वाहनचालकावर त्याचा परिणाम होत नाही. परिणामी, सिग्नलचा दिवा हिरवा होईपर्यंत डाव्या बाजूला जाण्यासाठी अडकून राहावे लागते. चौकात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाचे डाव्या लेनकडे लक्ष असेल, तर वाहतूक कोंडी होत नाही. डावी लेन अडवून ठेवणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.
चौकात डावी लेन अडवून ठेवणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:04 AM