लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार, राज्याचे आरोग्यमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता औरंगाबादचे नवे पालकमंत्री कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात लागलीच सुरू झाली आहे.डॉ. सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे रात्री सुपूर्द केला. हा राजीनामा मंजूर झाल्यास औरंगाबादला नवीन पालकमंत्री मिळणार आहे; मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा फेटाळल्यास काही काळ डॉ. सावंत हेच पालकमंत्री राहण्याचीही शक्यता आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघात सावंतांऐवजी विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे दुखावलेल्या डॉ. सावंत यांनी तडकाफडकी आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. डॉ. सावंत यांच्या आमदारपदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे मंत्रीपदावर कायम राहण्यासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. डॉ. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात तूर्तास काहीच प्रतिक्रिया उमटलेली नाही; त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास नवे पालकमंत्री कोण, याकडे लक्ष आहे.
औरंगाबादला मिळणार नवे पालकमंत्री?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:25 AM