काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:55 PM2020-03-05T19:55:50+5:302020-03-05T19:57:02+5:30

मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे.

Will Congress give new city president? will also appoint two working presidents | काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार

काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार

googlenewsNext
ठळक मुद्देनिरीक्षकांच्या मते औरंगाबादला काँग्रेसची संघटनात्मक बांधणीच नाही. स्वबळावर लढण्याचे स्वप्नही पाहत नाहीत

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष नामदेव पवार यांना प्रदेश काँग्रेसवर एखादे पद देऊन नवा शहराध्यक्ष व त्यांच्या जोडीला दलित व धनगर समाजाला प्रतिनिधित्व म्हणून दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा विचार सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे.

मागील लोकसभा निवडणुकीपासून बदलाचे संकेत मिळत होते; परंतु प्रत्यक्षात बदल काही होत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर तर शहराध्यक्ष बदला, अशी मागणी जोर धरू लागली होती. जोरदार लॉबिंगही करण्यात येत होते; परंतु प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, असे सांगितले जाते. सध्या मनपा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. काँग्रेससह सारेच राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज होत आहेत; परंतु काँग्रेससारख्या जुन्या व मोठ्या पक्षाची संघटनात्मक बांधणी औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या व कोणे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहरात अत्यंत कमजोर असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणी नाही. वॉर्डाध्यक्ष नियुक्त केले गेले नाहीत. बुथ कमिट्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रचना वॉर्डावॉर्डांतून बघावयास मिळत नाही. ही परिस्थिती आताही व भविष्यातही काँग्रेसला विजय मिळवू देऊ शकत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत बदल अटळ ठरत असून, ते न करणे ही मोठी चूक ठरू शकते. मनपा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने खरे तर संघटनात्मक बांधणीवर चांगले लक्ष द्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे स्वबळाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसला स्वबळावर फार तर ५० जागा लढवता येऊ शकतील. अनेक वार्डांमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड आहे. 

कालपासून शहराध्यक्ष नामदेव पवार हे मुंबईत आहेत. मध्यंतरी गांधी भवनात येऊन गेलेल्या तीन निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना देऊन टाकला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख हे लवकरच औरंगाबादला येणार असल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षकांच्या मते औरंगाबादला काँग्रेसची संघटनात्मक बांधणीच नाही. मुस्लिम शहराध्यक्ष व एक कार्याध्यक्ष दलित समाजाला व काही वॉर्डांमधील धनगर समाजाचे प्राबल्य पाहता एक कार्याध्यक्ष धनगर समाजाचा करावा, असा प्रस्ताव निरीक्षकांचा असल्याचे समजते. अर्थात, प्रदेशाध्यक्ष थोरात व अशोक चव्हाण यांचे काय मत पडते, यावर सारे अवलंबून आहे.

स्वबळावर लढण्याचे स्वप्नही पाहत नाहीत
एकेकाळी महापालिका निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने महापालिकेत काँग्रेसची तयारी असे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेस पक्षाने महापालिकेत काम केले आहे. काही वेळा शिवसेना- भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसने विविध समित्यांचे सभापतीपद भूषविले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचे स्वप्नही पाहत नाही, अशी अवस्था झाली आहे. आता तर आघाडीच्या माध्यमातून काही जागा निवडून येतात का, याची चाचपणी पक्षाकडून होत असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटत आहेत. 
 

 

Web Title: Will Congress give new city president? will also appoint two working presidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.