- राम शिनगारेऔरंगाबाद : भीक मागण्यासाठी दीड लाख रुपयात दोन बालकांना विकत घेण्याचा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीने शहरासह जिल्हाभरात भीक मागणाऱ्या बालकांचे आई-वडील तपासणी करण्यासाठी 'मुस्कान' अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांवर भीक मागणाऱ्या बालकांची प्रामुख्याने तत्काळ तपासणी केली जाणार असल्याची माहिती बालकल्याण समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. मनोहर बन्सवाल यांनी दिली.
मुकुंदवाडीत एका मायलेकीने ५ वर्षांचा मुलगा ५० हजार रुपये आणि जालन्यातील दोन वर्षांचा मुलगा १ लाख रुपयांना भीक मागण्यासाठी बॉण्ड पेपरवर करार करून विकत घेतला होता. यातील एका बालकाला बेलण्याने दररोज मारहाण होत असल्यामुळे शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी शहरातील विविध सिग्नल, चौकात भीक मागणाऱ्या मुलांची पाहणी केली. त्यामध्ये अनेक ठिकाणी अंदाजे १० वर्षे वयापर्यंतची अनेक मुले, मुली भीक मागताना आढळून आली. या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ती बोलण्याच्या मनस्थितीमध्ये दिसून आली नाहीत. यातील अनेक मुलांना त्यांचे मूळ नाव, गाव, आई-वडिलांची नावेही सांगता येत नव्हती. यात विशेष म्हणजे ही मुले भीक मागण्याशिवाय इतर काहीही बोलण्यास तयार नसल्याचेही दिसून आले. या सर्व प्रकारानंतर बाल कल्याण समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. बन्सवाल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमच्या बालकल्याण समितीकडे ० ते १८ पर्यंत अत्याचार झालेल्या बालकांचे संगोपन, संरक्षण करण्यात येत असल्याचे सांगितले. या पिडीत मुलांना बालगृहात ठेवण्यात येते. त्यामुळे क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह इतर ठिकाणी भीक मागणाऱ्या मुलांची तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात असलेल्या कक्षाची मदत घेतली जाणार असल्याचेही डॉ. बन्सवाल यांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक ! भीक मागण्यासाठी दीड लाखात दोन चिमुकल्यांना घेतले विकत; मायलेकी गजाआड
...तर बालगृहात मुलांना ठेवणाररस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची तपासणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. यात मुलांचे आई - वडील तपासण्यात येतील. या मोहिमेत काही मुलांचे आई - वडील सापडले नाहीत तर त्यांना बालगृहात दाखल केले जाणार असल्याचेही डॉ. बन्सवाल यांनी स्पष्ट केले.
तीन वर्षांपूर्वी राबविली माेहीमबालकल्याण समितीने तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मदतीने २०१७मध्ये रस्त्यावर भीक मागणारी मुले ताब्यात घेतली होती. यातील २ मुलींचे पालक असण्याचा दावा करणाऱ्यांच्या डीएनए चाचण्या केल्या होत्या, अशी माहिती माजी अध्यक्ष ॲड. रेणुका घुले यांनी दिली.