छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रपरिषदेला पत्रकार म्हणून मी जाणार असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी दिली. त्यांनी आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर खा. संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. खा. राऊत पुढे म्हणाले, राज्यातील राजकीय स्थितीबाबतचा निकाल चाळीस दिवसांत लागणे अपेक्षित होते, त्यावर अद्याप काहीही झाले नाही. सहा महिन्यांपूर्वी सरकार बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने सांगितले. शासन आपल्या दारी कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत, याचा हिशेब सरकारला द्यावा लागेल, असेही खा. राऊत म्हणाले.
पत्रकार म्हणून जाणार मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोणासाठी खर्च केला याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. शनिवारी मंत्रिमंडळ बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रपरिषद होईल त्याला एक पत्रकार म्हणून जाणार असल्याचे खा.राऊत म्हणाले. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्रकार संजय राऊत यांच्यात घमासान पाहायला मिळेल अशी चर्चा सुरु झाली आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्री दडून बसलेगृहमंत्री शहा यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, म्हणून कोणत्याही परिस्थितीत अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांचे आंदोलन संपविण्याचे आदेश दिल्लीमधून मिळाले, म्हणून मुख्यमंत्री आले. दोन्ही उपमुख्यमंत्री तर दडून बसल्याचा आरोपही त्यांनी केला.