औरंगाबाद : लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये काही बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी जवळच टूल बाॅक्स पाहिजे. मात्र, घाटीत तसे आढळून आले नाही. टूल बाॅक्स इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असल्याचे समोर येताच ‘इंजेक्शन लागले आणि ते दुसऱ्या गावात असेल तर चालेल का? ’ अशा शब्दांत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घाटीतील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घाटीतील सोईयुविधांचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे-कागीनाळकर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. प्रभा खैरे, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. विकास राठोड, आदी उपस्थित होते. सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमधील विविध वाॅर्डांची पाहणी करून केंद्रेकर आणि चव्हाण यांनी विविध सूचना दिल्या.
इमर्जन्सी रिस्पाॅन्स असा असतो का?सुनील केंद्रेकर यांनी ऑक्सिजनच्या टँकमध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या टूल किटची मागणी केली. तेव्हा त्यास उशीर झाला. काही पान्हे घेऊन कर्मचारी पोहोचल्या. त्यावर ‘टूल किट अशी असते का, इमर्जन्सी रिस्पाॅन्स असा असतो का?’ असा प्रश्न केंद्रेकर यांनी उपस्थित केला. टँकजवळ टुल किट ठेवण्याच्या, टँकवरून जाणाऱ्या केबल्स हटविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
घाटी रुग्णालयाचे चांगले कामघाटी लिक्विड ऑक्सिजन टँकची क्षमता सध्या ७१ हजार लिटर आहे. ती आणखी ४० हजार लिटरनी वाढविण्यात येणार आहे. घाटीसाठी निधीचा प्रश्न निर्माण होणार नाही. मागच्या लाटेचा अनुभव आहे. थोड्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांच्या संख्येनुसार खाटा वाढविण्यात येतील, असे सुनील केंद्रेकर म्हणाले.