औरंगाबाद: डीएमआयसी ऑरिक सिटी ते वाळूज ( DMIC to Waluj Aurangabad Metro ) या दोन एमआयडीसीला मेट्रोने जोडण्याचा विचार प्रशासन करते आहे. मनपाने (Aurangabad Municipal Corporation ) मेट्रोचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) बनविण्यासाठी पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन संस्था) नियुक्तीची तयारी केली होती. मात्र, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मनपाऐवजी स्मार्ट सिटीवर मेट्रोसाठी पीएमसी नियुक्तीची जबाबदारी सोपवली आहे. मनपाला पीएमसी नेमण्याचा खर्च झेपणार नाही, असे लेखा विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर स्मार्ट सिटीकडून मेट्रोचा डीपीआर तयार करण्यासाठी पीएमसीची नियुक्ती केली जाणार आहे.
स्मार्ट सिटीने पीएमसी नियुक्तीची तयारी सुरू केली असून लवकरच प्रस्ताव तयार करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई, पुणे व नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू केली आहे. मेट्रोमुळे जलदगतीने प्रवास होऊन वेळेची बचत होत आहे. वाळूज ते ऑरिकसिटी या दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील अंतर कमी करण्यासाठी व उद्योजक व कामगारांना जलदगतीच्या दळणवळणाची सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टीने मनपाने पहिल्या टप्प्यात वाळूज ते ऑरिक सिटी असा मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्तीची तयारी सुरू केली होती. आता स्मार्ट सिटी प्रकल्पातून पीएमसी नेमली जाईल.
केंद्रीय मंत्र्यांसमोर ठेवणार प्रस्ताव२ हजार कोटींच्या गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय पेट्रोलियम तथा नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी हे पुढच्या आठवड्यात शहरात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर शहरातील उद्योगसंघटना विकासाच्या दृष्टीने सादरीकरण करणार आहेत. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) हे मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव पुरी यांच्यासमोर सादर करणार आहेत. आता सादरीकरण केले तर आगामी काळात मंजुरी मिळून अनुदान मिळेल, अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी व्यक्त केली.