औरंगाबाद : सिडकोतील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी गार्डनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या १७ एकर परिसरात असणारे ८६७० झाडांना तोडण्यात येणार नाही. उलट या ठिकाणी जांभूळ व चाफ्याची झाडे लावण्यात येतील. जांभूळबन तयार करण्यात येईल, जेणे करुन झाडांची संख्या वाढेल व पक्षी येतील, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शहरात आले आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सिडको परिसरातील नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली. एमजीएम हॉस्पिटल परिसरातील १७ एकर जागेवर प्रियदर्शनी गार्डन आहे. येथे निलगिरीचे व अन्य असे सुमारे ८६७० झाडे आहेत. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. याची पाहणी उद्धव ठकारे यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजय महेता, महापौर नंदकुमार घोडेले, दिल्ली व मुंबई येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसीचे अधिकारी , आर्किटेक्ट यांची उपस्थिती होती.
यावेळी स्मारक व परिसराचा विकास कामाच्या नकाशाची काहीवेळ माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पहिलेच स्पष्ट केले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना गार्डनमधील एकही झाड तोडण्यात येणार नाही. या ठिकाणी निलगीरीसह अन्य झाडे आहे. तिथे जांभूळबनाच्याधर्तीवर जाभांळाची तसेच चाफाची झाडेही लावण्यात येणार आहे. जेणे करुन झाडावर पक्षीही येतील.स्मारकासाठी दोन ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात पालकमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक जागा निश्चित करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारका सोबतच आर्ट गॅलरी असणार आहे. त्यांनी काढलेले व्यंगचित्र,त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा त्यात समावेश असणार आहे. यावेळी मनपाचे अधिकारी, अनेक शिवसैनिकही हजर होते.