औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभास्थळी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या सभास्थळी प्रथमच संभाजी महाराजांचा पुतळा दिसल्याने शहर नामकरणाबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करतात का याची उत्सुकता आहे. यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया देत, शहराचे संभाजी नगर हे नाव म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या दगडावर मारलेली भगवी रेघ आहे, असे स्पष्ट केले. तसेच आम्ही सर्व शहराचा संभाजीनगर असाच करतो. प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा दावाही देसाई यांनी यावेळी केला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज सायंकाळी सभा होत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने होणाऱ्या हिंदुत्वाचा हुंकार या घोषवाक्यासह सभेचा प्रचार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेच्या माध्यमातून भाजप, मनसे आणि एमआयएमवर हल्ला चढवणार असा अंदाज आहे. मात्र, यापूर्वीच शिवसेनेच्या सभास्थळी प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आल्याने शहर नामकरणाची आज मुख्यमंत्री घोषणा करणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.
याबाबत सभास्थळाची पाहणी करण्यास आलेले उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शहराचे संभाजीनगर हे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या दगडावर मारलेली भगवी रेघ आहे. आम्ही सर्वजण शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करतो. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासकीय बाबतीत काय कमतरता आहे. याचा आढावा घेतला आहे. लवकरच शहर नामकरण होईल, असा दावा केला.
मुख्यमंत्री ठाकरी भाषेत समाचार घेणार शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठ्या कालखंडानंतर सभा होत आहे. सभेत मुख्यमंत्री ठाकरी भाषेत सर्व विरोधकांचा समाचार घेतील. सभेला प्रचंड गर्दी होणार असून शिवसैनिकांमुळे सभास्थळ ओसंडून वाहील. सर्वांना सभेचा आस्वाद घेता यावा यासाठी शहरातील तीन ठिकाणी खुल्या जागेत मोठ्या पडद्याची सोय करण्यात आली आहे. तिथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पडद्यावर सभा लाईव्ह दिसले. ही सभा शिवसेनेचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडेल अशी होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.