औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांची मूल्यांकनासंदर्भातील माहिती भरण्यास अखेर गुरुवारी सुरुवात झाली. शाळांकडून २ जुलैपर्यंत ऑनलाईन निकाल भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर निकालाची पडताळणी विभागीय मंडळ करेल. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हा निकाल जाहीर होण्याची शक्यता मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लावण्यात येणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सांगण्यात येत होते. राज्य शिक्षण मंडळाच्या मूल्यमापनाचे तसेच गुण विभागणीच्या पद्धतीचे आदेश शिक्षकांनी पूर्णपणे समजून न घेतल्याने अडचणी येत होत्या. या प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे विषय शिक्षकांकडून मिळालेले मूल्यांकन शाळा समितीला २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मागील तीन दिवसांपासून लिंक सुरू झाली नाही.
अखेर बुधवारी (दि. २३) लिंक मिळाली; पण सर्व्हर ठप्प होते. गुरुवारी शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. त्याला शाळांकडूनही दुजोरा मिळाला. दुसऱ्या टप्प्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत २ दिवस वाढविल्याने आता २ जुलैपर्यंत हे काम चालेल. त्यानंतर दुरुस्ती, विषय बदल, त्रुटी आदी कामे बोर्डाचा ईडीपी विभाग करेल. त्यानंतर निकालाची पडताळणी होईल. यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. यावर्षी त्यासाठी किती वेळ लागेल याचे उत्तर बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे नाही. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हीच प्रक्रिया सुरू राहील व दुसऱ्या आठवड्यानंतर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
---चौकट
...............
बुधवारी शाळांकडून निकाल भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. २ जुलैपर्यंत हे काम सुरू राहील. त्यानंतर त्रुटी, दुरुस्तीची कामे, पडताळणीनंतर निकाल अंतिम झाल्यावर निकाल जाहीर होईल. निकालाच्या निश्चित वेळेबाबत राज्य मंडळ निर्णय घेईल.
- डाॅ. बी. बी. चव्हाण, प्रभारी सचिव, विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद