जालना : संपूर्ण मराठवाड्यात मोठी बाजारपेठ म्हणून शहराची ओळख आहे. असे असले तरी तब्बल पाच वर्षांपासून पथदिवे बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शहर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेले असते. वीजबिलाची थकबाकी तब्बल दहा कोटींवर गेल्याने ही स्थिती ओढावली आहे. तर स्वच्छतेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्ते दुरूस्तीसोबतच वीज बिलाचा भरणा करणे उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने पालिकेला कठीण होत आहे. शहरात विकासाचा प्रकाशकिरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणतील का? अशी अपेक्षा शहरवासियांना आहे. जालना शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविताना पालिकेची पुरती दमछाक होत आहे. बंद पथदिवे आणि अस्वच्छता या दोन महत्वाच्या प्रश्नांमुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आहे. शहरात पथदिवे आणि स्वच्छता या दोन मुद्यांवर नगर पालिकेकडून थातूरमातूर कामे करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असतो. शहरत गत पाच वर्षांपासून पथदिवे बंद आहेत. काही भागात प्रकाश तर काही ठिकाणी अंधार असतो. नगर पालिकेकडे दहा ते बारा वर्षांपासून पथदिव्यांच्या बिलापोटी तब्बल १० कोटींची थकबाकी आहे. पालिकेने गत पाच वर्षांत व्याज व दंड मिळून ५ कोटी १० लाख रूपये महावितरणकडे भरले आहेत. मात्र मूळ रक्कम तशीच राहत असल्याने व्याज वाढत आहे. परिणामी पथदिवे बंदच आहेत. शहरात सुमारे १३ हजार पथदिवे आहेत. यातील ३० ते ४० टक्के पथदिवे सुरू आहेत. ते कसे सुरू आहेत याची माहिती पालिका अथवा महावितरणलाही नाही. थकबाकी पोटी पथदिव्यांचा पुरवठा बंद असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात. एकूणच पथदिव्यांची थकबाकी पालिकेला पेलवत नसल्याने शहरवासियांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. पथदिव्यांच्या थकबाकीपोटी पालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांत अनेक चर्चेच्या फेऱ्या झडल्या. मात्र तोडगा निघू शकलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जामंत्र्यांना मध्यस्थी करण्यास सांगून शहरातील पथदिवे प्रकाशमान करावेत, अशी अपेक्षा जालनेकरांतून व्यक्त होत आहे. शहराच्या १४ झोनपैकी दोन झोनमध्ये जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५० किमी जलवाहिनी अंथरली आहे. या कामाचा आराखडा मात्र तयार नसल्याचे समजते.प्रत्येक विभागात सोयीनुसार हा आराखडा तयार करून काम करण्यात येत आहे.
शहरातील पथदिवे सुरू होतील का ?
By admin | Published: May 13, 2017 12:31 AM