औरंगाबाद : ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, जय भवानी जय शिवाजी... तुमचं आमचं नातं काय... जय जिजाऊ जय शिवराय... या घोषणांनी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट परिसर दणाणला होता. निमित्त होते शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाचे.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येत आहे. खुलताबादहून बुधवारी दुपारी निघालेला बहुप्रतीक्षित पुतळा साडेसात वाजेच्या सुमारास विद्यापीठ गेटवर पोहोचला. पुतळ्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. साडेआठ वाजेच्या सुमारास पुतळा क्रेनच्या साह्याने चबुतऱ्यावर बसवण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी विजय सुबुकडे, सुधाकर सोनवणे, अमोल दांडगे, गणू पांडे, मोसीन खान, कुणाल खरात, कमलेश चांदणे, दिशा पवार, किशोर नामेकर, डॉ. दीपक बहिर, नामदेव कचरे, अमोल धनेश्वर, अमोल खरात, लोकेश कांबळे आदींसह विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रेमींची उपस्थिती होती.
असा आहे पुतळ्याचा सुशोभित परिसर४८०० चौरस मीटरचा परिसर सुशोभित करण्यात आला. त्यात १.७ बाय १.५ मीटरचा १२ फूट उंच चबुतरा उभारण्यात आला. त्याला नेवासा स्टोनने सजवण्यात आले आहे. पायथ्याशी विविधरंगी फुलांची लागवड केली. १०५० चौरस मीटरचे, उद्यान विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. बांधकाम विभागाचे अभियंता काळे, जितेंद्र पाटील यांच्यासह कंत्राटदार अतुल निकम यांच्या चमूने मेहनत घेतली. चबुतऱ्यासह या कामांवर १ कोटी ३० लाखांचा खर्च आला.
११ फूट उंच, तर २२५ किलो वजनपुतळ्याच्या शिल्पाचे काम शतकुंदा आर्ट स्टुडिओत कंपनीला देण्यात आले होते. नरेंद्र साळुंखे व स्वाती साळुंखे या शिल्पकारांच्या चमूने बनवलेल्या ११ फूट उंच, तर २२५ किलो वजनाच्या ब्राॅन्झच्या या पुतळ्याला ३५ लाखांचा खर्च आला.
अनावरण १६ सप्टेंबरला?अनावरणासंबंधी मुख्यमंत्री कार्यालयासोबत बोलणे झाले आहे. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळा अनावरण होण्याची शक्यता आहे. अद्याप मुख्य अतिथींची वेळ निश्चित झालेली नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री यांनाही आमंत्रण जाईल. बऱ्याच वर्षांची मागणी माझ्या कार्यकाळात पूर्ण झाली, हे मी माझे भाग्य समजतो. यात कुठेही राजकारण नाही, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.