छत्रपती संभाजीनगर : शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का, असा सवाल शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. यापुढे मनोज जरांगे आणि मराठा समाजावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली
वैजापूर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी खा. राऊत शुक्रवारी रात्री शहरात मुक्कामी होते. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण तणावाखाली होत ढवळून निघाले. जरांगे पाटील लाखो लोक घेऊन मुंबईला निघाले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती. यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना जाऊन भेटावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. शनिवारी मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना भेटले. सरकारने काढलेल्या अध्यादेशात मागण्या पूर्ण होत आहेत का, हा मुख्य सवाल असल्याचे ते म्हणाले. ओबीसीचे सर्व मोठे नेते भाजपसोबत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आल्याचे बोलले जात आहे, याकडे तुम्ही कसे पाहता याविषयी शिवसेना नेते म्हणाले, देशात रामराज्य नव्हे तर पलटूरामाचे राज्य आलेले आहे. नितीशकुमारांसाठी भाजपचे रस्ते बंद आहेत. अमित शाह यांनी पाटणा येथे जाऊन ‘पलटी कुणी मारली?’ असा सवाल नितीशकुमारांना केला आहे. मग आता पलटी कोण मारतंय? रामराज्य आले असते तर राज्यात एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले. यापेक्षा रावणाचे राज्य चांगले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.
प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधान रक्षणाची जबाबदारीकुणी देशात भाजपला मदत करीत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल, असे त्यांच्याकडून होऊ देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सर्वात जास्त जबाबदारी आहे. भाजपचा पराभव करायचा आहे, असे आमचे ठरल्याचे ते म्हणाले.