छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापरिषदेतुन दोन सदस्य व्यवस्थापन परिषदेवर पाठवण्यासाठी शनिवारी (दि.३०) मतदान होणार आहे. एकुण ६० मतदार असून, त्यात सत्ताधारी भाजपाच्या संबंधित विद्यापीठ विकास मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उत्कर्ष गटामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
विद्यापरिषदेतील पुरुष गटात मंचकडून डॉ. व्यंकटेश लांब आणि उत्कर्षचे डॉ. राजेश लहाने यांच्यात तर महिला गटात उत्कर्षच्या डॉ.रेखा गुळवे आणि मंचच्या डॉ.अपर्णा पाटील यांच्यात सामना होत आहे. सुरुवातीपासून एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची बनली आहे. या निवडणूकीत ६० मतदार आहेत. त्यातील प्राचार्य डॉ. हरिदास विधाते हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे मतदनासाठी येण्याची शक्यता कमी आहे. त्यातच विद्यापीठ प्रशासनातील तब्बल १० अधिकारी मतदार आहेत. त्यामुळे प्रशासन कोणत्या सत्ताधारी गटाच्या बाजूने उभे राहते, त्यावरच निकाल अवलंबुन असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंच समर्थक एका गटाने प्रशासनाने सुरू केलेल्या प्राध्यापक भरतीला प्रचंड विरोध केला होता. त्याचा फटकाही मंचला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंचच्या वरिष्ठ पातळीवरुन कोणते आदेश येतात. त्यावरच सर्वकाही अवलंबुन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही गटात गटबाजीला उधाणभाजपच्या संबंधित विद्यापीठ विकास मंच समर्थक सदस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. आजी-माजी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये शितयुद्ध सुरू असते. त्यात मंचचे उमेदवार आजी सदस्यांचे समर्थक असून, त्यावर माजी सदस्यांचे समर्थक कोणती भूमिका घेतात, त्यावरही निवडणूकीचा निकाल अवलंबून असणार आहे. त्यातच राष्ट्रवादी समर्थक उत्कर्षचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन हे सुद्धा ऐन निवडणूकीतच नेतृत्व करण्यासाठी समोर येतात. मुलासाठी विरोधकांशी हातमिळवणी करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधातही नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.