औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटी रुग्णालयास १५० व्हेंटिलेटर प्राप्त झाले; परंतु अंतिगंभीर रुग्णांच्या वापरायोग्य हे व्हेंटिलेटर नाहीत. शिवाय नादुरुस्त असल्याने रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर बिनकामाचे ठरले आहे. तरीही हे व्हेंटिलेटर दुरुस्त करून रुग्णांना वापरण्याचा खटाटोप करण्यात आला. काही व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना, इतर जिल्ह्यांना देण्यात आले. एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात असून, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे नादुरुस्त व्हेंटिलेटरप्रकरणी दोषींवर कारवाई होणार का, अथवा व्हेंटिलेटरवरून केवळ राजकारण होईल, याकडे लक्ष लागले आहे.
केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून घाटीला पुरवठा होईपर्यंत व्हेंटिलेटरचा दर्जा कुठेही पडताळण्यात आला नाही. घाटीत दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी व्हेंटिलेटर आयसीयूत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला; पण त्यानंतरही व्हेंटिलेटर दुरुस्त करण्याचा, रुग्णांना वापरण्याचा खटाटोप सुरूच ठेवण्यात आला; परंतु त्यात कुणालाही यश आले नाही. नवीन व्हेंटिलेटरची अशी अवस्था असेल तर रुग्णांचा जीव कसा वाचणार, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. व्हेंटिलेटरसाठी रुग्ण वेटिंगवर असतात. त्याच वेळी नवे व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याची स्थिती आहे. नादुरुस्त व्हेंटिलेटर देऊन रुग्णांची थट्टाच करण्यात आली. त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
पुरवठा करणारे, वापरणारे, इतरांना देणारे की दबाव टाकणारे दोषी?
ज्या कंपनीने व्हेंटिलेटर बनविले ते की, ज्यांनी या व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली, ज्यांनी रुग्णालयांना पुरवठा केला, ते या सगळ्याला दोषी आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे लक्षात आल्यानंतरही ते परत पाठविण्याऐवजी दुरुस्त करून रुग्णांना वापरण्याचा, खासगी रुग्णालयांना आणि इतर जिल्ह्यांना देणारे दोषी आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. व्हेंटिलेटर वापरण्यासाठी कोणी दबाब टाकला असेल तर त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
-------
गुन्हा दाखल करावा
सदर व्हेंटिलेटर १२ एप्रिल रोजीच वापरण्यायोग्य नसल्याचे समजले. तरीही त्यानंतर हे व्हेंटिलेटर इतर जिल्ह्यांना देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले. घाटी प्रशासनाने स्पष्ट सांगितले पाहिजे होते की, व्हेंटिलेटर काम करीत नाही आणि पाठवून उपयोग नाही. सर्व व्हेंटिलेटर परत पाठवून दुसरे व्हेंटिलेटर घेतले पाहिजे. ज्यांनी या व्हेंटिलेटरचा पुरवठा केला, त्या एजन्सीवर कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे.
-खा. इम्तियाज जलील
----
शिक्षा झाली पाहिजे
पीएम केअर फंडातील नादुरुस्त व्हेंटिलेटरप्रकरणी कोण दोषी आहेत, हे सरकारने शोधले पाहिजे. पुरवठा करणारे दोषी की, ऑर्डर देणारे दोषी आहेत, हे सरकारने ठरवावे. यात जे जे खरोखर गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
- आ. सतीश चव्हाण