बापू सोळुंके
औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण अधिक होत असेल तर अशा वाहनांची पुनर्नोंदणी न करता ते थेट भंगारात काढले जाणार आहे. तुम्ही वापरत असलेले जुने वाहन अनफिट असेल तर ते या धोरणानुसार भंगारात काढले जाऊ शकते.
औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या औरंगाबादेत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. जूनअखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणीकृत वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांहून अधिक आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन स्क्रॅप धोरणानुसार १५ वर्षांपूर्वीचे वाहन भंगारात काढले जाऊ शकते. खाजगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या बाबतीत वेगवेगळा नियम आहे. व्यावसायिक प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहन फिट नसेल तर आरटीओ अधिकारी त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देत नाहीत. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही वाहनाची पुनर्नोंदणी केली जात नाही.
--------------------------------
चौकट
१५ वर्षांची जुनी खासगी वाहने- १ लाख ९६ हजार २३९
१० वर्षांची जुनी खासगी वाहने- ३ लाख ७७ हजार ८५४
१० वर्षांची जुनी व्यावसायिक वाहने - ८९ हजार ८९५
-------------
वाहन सुस्थितीत असेल तरच मिळेल फिटनेस प्रमाणपत्र
१५ वर्षांनंतरही वाहन वापरायचे अथवा विक्री करायचे असेल तर आरटीओ कार्यालयात वाहन न्यावे लागते. आरटीओ अधिकारी वाहनाच्या इंजिनसह बॉडी सुस्थितीत आहे अथवा नाही, हे पाहून वाहन चालवून पाहतात. वाहनामुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण या सर्वांचा अभ्यास करून ते वाहन फिट आहे अथवा अनफिट याविषयी निर्णय घेतात. सुस्थितीतील खाजगी वाहनांची पाच वर्षांसाठी पुनर्नोंदणी केली जाते. अनफिट वाहन लगेच भंगारात काढण्याचे आदेश दिले जातात.
------------------------
भंगारातील हजारो रिक्षा, दुचाकी वाहने रस्त्यावर
ज्या मालकाला त्याचे वाहन १५ वर्षांनंतरही वापरायचे आहे अथवा ते कुणाला विक्री केल्याचा अधिकृत व्यवहार करायचा आहे, अशी वाहनेच आरटीओकडे येतात, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे प्रमाण केवळ २ ते ३ टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. १५ वर्षांनंतर दुचाकीमालक त्यांचे वाहन एक तर बॉण्डपेपरवर विक्री करतात; परंतु असे वाहन आरटीओ दप्तरी मूळ मालकाच्या नावेच असते. हजारो दुचाकी आणि मालवाहू, तसेच रिक्षा विना फिटनेसच्या रस्त्यावर धावतात. अशी वाहने आढळल्यास आरटीओ अधिकारी ते जप्त करतात.
------------------------------
कोट...
...तर द्यावा लागतो ग्रीन टॅक्स
१५ वर्षांनंतरही वाहन वापरण्यास योग्य असेल तर फिटनेस प्रमाणपत्र देऊन त्या खाजगी वाहनाची ५ वर्षांकरिता पुर्नोंदणी करता येते. याकरिता वाहनमालकाला ग्रीन टॅक्स आरटीओ कार्यालयात भरावा लागतो.
संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद