औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बिडकीन गावाला तालुका करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मागणीला काही प्रमाणात यश मिळाले असून, बिडकीन हा तालुका निर्मितीसाठी शासनानेच हा प्रस्ताव मान्यतेच्या दृष्टीने विचारता घेतला आहे. यासाठी आज ( सोमवारी ) लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य यांची उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यात आली आहे.
गेल्या ३२ वर्षांपासून बिडकीन परिसरातील गावातून तालुक्याची मागणी होत असताना त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात होते. विशेष म्हणजे ही मागणी होत असताना फुलंब्री व घनसावंगीला तालुक्याचा दर्जा दिला होता. तर त्यापूर्वीच बिडकीनकरांच्या मागणीला दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र आता प्रशासनाकडूनचं बिडकीनला तालुक्याचे दर्जा देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
बिडकीनला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून १९९९ मध्ये परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या मागणीसाठी २० मे १९९९ रोजी बिडकीन येथे कडकडीत बंद पाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यांनतर ही या मागणीसाठी सतत पाठपुरवठा सूर असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले होते.
तर अनेक वर्षांपासून होत असलेल्या या मागणीला आता यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षेतेखाली या संदर्भात बिडकीन येथे आज एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधी,स्थानिक नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले असून त्याचे अहवाल प्रशासनाकडे पाठवले जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच बिडकीनला तालुक्याचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.