लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर असून, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरुन पाणी शहराला वितरीत केले जात आहे, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी रविवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, दुष्काळी भागात जार आणि बाटलीबंद पाणी टॅक्स फ्री करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली. रेल्वेने पाणी येणार का, असा सवालही या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला़शासकीय विश्रामगृह येथे रविवारी सुकाणू समितीची बैठक झाली़ या बैठकीत लातूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली़ प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़ बैठकीस आ. अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर अख्तर शेख, उपमहापौर राजेंद्र कांबळे, मोईज शेख, अतुल देऊळगावकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती़ (आणखी वृत्त हॅलो २ वर)लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करणार का, ८ एप्रिलला रेल्वेने पाणी येणार असेल तर आम्हाला स्वागत करायचे आहे, असे प्रश्न आ़अमित देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अतुल देऊळगावकर यांनी या बैठकीत उपस्थित केले़ जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने अधिकृत काहीही सूचना केलेल्या नसल्याचे सांगितले़ शिवाय, रेल्वेने पाणीपुरवठा करणे सध्या तरी शक्य नाही. राजस्थानातील काही जिल्ह्यामध्ये रेल्वेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तेथील माहिती घेतली जात आहे़ रेल्वेने पाणी आणण्याबाबतचा आपलाही प्रस्ताव राज्य शासनाकडे असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़
रेल्वेने पाणी येणार का; जिल्हाधिकाऱ्यांना सवाल
By admin | Published: April 04, 2016 12:32 AM