औरंगाबाद : गरिबीची जाण, आई-वडिलांचे संस्कार, प्रामाणिकपणा या शिदोरीवर डॉक्टर म्हणून काम करताना यशस्वी झालो. तेच सूत्र राजकारणातही पाळत आहे. शहरासाठी, मराठवाड्यासाठी आणि विशेष करून वैद्यकीय क्षेत्रासाठी केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून खूप काही करण्याची इच्छा आहे आणि निश्चितच चांगले काम करेन, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पेडियाट्रिक सर्जन संघटनेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केला.
शहरातील पेडियाट्रिक सर्जन संघटनेने डॉ. कराड यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर डॉ. अंजली कराड, डॉ. राजीव तोतला, डॉ. रमेश बजाज यांची उपस्थिती होती. डॉ. कराड म्हणाले की, ज्या व्यवसायात मी कारकिर्दीची सुरुवात केली, त्या व्यवसाय बंधूंनी केलेला हा सत्कार म्हणजे कौटुंबीक सत्कार असल्याने त्याचा अधिकच आनंद असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांना उजाळा दिला.
पेडियाट्रिक सर्जन संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पेडियाट्रिक सर्जन डॉ. राजीव तोतला यांनी डॉ. कराड यांच्या सत्कार सोहळ्याबाबत भूमिका विशद केली. हा सोहळा म्हणजे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचा सत्कार असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. मार्तंड पाटील यांनीही यावेळी जुन्या मैत्रीला उजाळा दिला. कार्यक्रमाला डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. प्रदीप राठोड, डॉ. पिनाकीन पुजारी, डॉ. कैसरुद्दीन, डॉ. अर्जुन पवार, डॉ. संतोष तोतला यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्यानंद देशपांडे यांनी केले. डॉ. रमेश बजाज यांनी आभार मानले.
फोटो ओळ..
पेडियाट्रिक सर्जन संघटनेच्यावतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी आणि डाॅक्टर्स.