औरंगाबाद : राष्टीय अन्न सुरक्षा अभियानात अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिक व बियाणे मिनिकहटचा फायदा घ्यायचा आहे अशा जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे.
विविध योजनांसाठी कृषी विभागाने महाडीबीटी हे पोर्टल सुरू केले आहे. यादी ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांमधून सोडत काढून त्यातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होते.
संपूर्ण योजना ऑनलाईन असल्याने भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच येत नाही. खरीप हंगामासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ मे २०२१ होती. औरंगाबाद जिल्ह्यात १९ हजार ९८ शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यातही सर्वाधिक ऑनलाइन अर्ज वैजापूर तालुक्यातून प्राप्त झाली. जालना जिल्ह्यात १ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. या महाडीबीटी पोर्टलविषयी जागरूकता नसणे किंवा शेतकऱ्यांमधील उदासीनता ही दोनच कारणे समोर येत आहेत.
चौकट
जिल्ह्यातून १९ हजार अर्ज
महाबीडीटी पोर्टलवर २३ मे २०२१ च्या सायंकाळपर्यंत जिल्ह्यातून १९ हजार ९८ अर्ज प्राप्त झाले.
यात सर्वाधिक ५३०३ अर्ज वैजापूर तालुक्यातून प्राप्त झाले.
सिल्लोडमधून ४०९० अर्ज, औरंगाबाद तालुका २८२६, कन्नड २१७८, पैठण १६७७, गंगापूर ९२७, फुलंब्री ७८८ व खुलताबाद तालुक्यातून सर्वात कमी ७८८ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.
चौकट
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज
१) प्रमाणित बियाणे वितरण - १०३००
२) प्रात्यक्षिक - ६१७२
३) आंतरपीक प्रात्यक्षिक- १४१८
४) मिनी किट वितरण- १२०८
-----
चौकट
प्रमाणित बियाण्यांसाठी सर्वाधिक अर्ज
जिल्ह्यात प्रमाणित बियाण्यांसाठी सर्वाधिक १०,३०० अर्ज प्राप्त झाले आहेत. यात कडधान्य, भरडधान्य ज्यात मकाचा समावेश आहे. याशिवाय पौष्टिक तृणधान्य व व्यापारी पिके कापूस यांचा समावेश आहे.
चौकट
लॉटरी लागली तरच...
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला. कापूस बियाण्यांसाठी मात्र याची लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी लागली तरच रक्कम मिळेल यामुळे सर्व नशिबाचा खेळ आहे.
सुधाकर पळसकर
शेतकरी
-----
लॉकडाऊनमुळे अडचणी
आमची शेती फुलंब्री तालुक्यात आहे. पण आम्ही औरंगाबादमध्ये राहतो. मोबाईलवर जमत नसल्याने महा ई सेवा केंद्रात गेलो पण लॉकडाऊनमुळे सर्व केंद्र बंद होते. अखेर सिडकोतील एका केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरला.
विनायक आगे
शेतकरी
---
(जोड)