दत्ता थोरे लातूरजिल्हा परिषद जिंकलेल्या भाजप सदस्यांत शुक्रवारी एकच चर्चा होती, ती म्हणजे कोण होणार ‘जिल्हा परिषदेचा अध्यक्ष?’ या एकाच उत्सुकतेच्या प्रश्नाभोवती लातूर जिल्ह्याची भाजपा फिरत होती. शेतकरी अध्यक्ष करणार, असे सांगून घराणेशाहीला विरोध करणाऱ्या पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नवनिर्वाचित भाजपा सदस्यांत वावरातला शेतकरी एकही नाही. मात्र बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे खुल्या गटातून निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून शुक्रवारनंतरचे दिवस फिल्डिंग लावण्यात गुंतविले आहेत. गट-तट विसरून भाजपा एकीने जिल्हा परिषदेत लढली. संभाजीराव पाटील निलंगेकर गट, केंद्रे-कराडांचा मुंडे गट, सुधाकर भालेरावांचा स्वतंत्र गडकरी गट, नव्याने भाजपात आलेल्या विनायकराव पाटलांचा ‘शिट्टी’ गट आणि दस्तुरखुद्द संभाजीराव पाटील निलंगेकरांचा निलंगेकर कम्, गडकरी कम् फडणवीस गट अशा चार गटांनी एकीची मोट बांधून काँग्रेसविरुद्धचा किल्ला लढविला. आता कोणत्या गटाचा अध्यक्ष होणार, या चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते. यावर गटा-तटाच्या भिंती नसून, आमची एक भाजपा आहे, असे पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगत एकमुखाने अध्यक्ष निवड होईल, असे सांगितले. हडोळतीच्या सभेत त्यांनी ‘हडोळतीला लाल दिवा’ असे विधानच केले नव्हते, असे सांगून युटर्न घेतला. त्यामुळे प्रकाश देशमुखांचा पत्ता कट झाला की काय, अशी शंका अहमदपूरकरांना आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या युटर्नमुळे मुंडे गट म्हणून हडोळतीचा अव्हेर झाला की काय, अशा शंका येत आहेत. सर्वाधिक जागा निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडून आलेल्या आहेत. निलंग्यात ८ जागा भाजपाला मिळाल्या. तालुका म्हणून कोणत्याच तालुक्यात एवढ्या जागा निवडून आलेल्या नाहीत. तर निलंगा विधानसभा मतदारसंघात १३ जागा निवडून आलेल्या आहेत. यानंतर नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या विनायकराव पाटील यांच्या ‘शिट्टी’ गटाचा आवाज आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ९ तर तालुक्यात ४ जागा त्यांनी जिंकल्या. तालुका म्हणून ते तिसऱ्या क्रमांकावर तर विधानसभा मतदारसंघ म्हणून दुसऱ्या क्रमांकाची सदस्य निवडून आणण्यात ते यशस्वी झाले आहेत.
कोणाला मिळणार जिल्हा परिषदेचा लाल दिवा ?
By admin | Published: February 25, 2017 12:32 AM