लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बदल्या झालेल्या शिक्षकांच्या याद्या सप्टेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तथापि, अवघड क्षेत्रात ३ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या बदली अधिकार पात्र शिक्षकांना आॅनलाइन नोंदणीसाठी गुरुवारी दुपारपासून ‘पोर्टल’ सुरू करण्यात आले असून, बदलीसाठी नोंदणी करण्यास शनिवार हा शेवटचा दिवस असून, इच्छुक शिक्षक नोंदणी करू शकतात.यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची गत ‘लांडगा आला रे...’ च्या गोष्टीसारखी झाली आहे. दोन महिन्यांपासून दर दहा- पंधरा दिवसांनी बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर होणार, मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे लॉगिंग खुले होणार, अशा वावड्या उठायच्या. साधारणपणे दरवर्षी मेअखेरपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होत असे. यावेळी चार महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्यापही बदल्यांची प्रक्रिया पूर्णत्वाकडे गेलेली नाही. यामुळे आपल्या जागेवर गंडांतर येते की काय, या भीतीपोटी अनेक शिक्षकांचे लक्ष अध्यापनापासून विचलित झालेले आहे.जिल्ह्यात ३८९ शिक्षक हे अवघड क्षेत्रात कार्यरत असून, यापैकी ज्या शिक्षकांना सोप्या क्षेत्रात बदली हवी आहे, अशा शिक्षकांसाठी गुरुवारी दुपारी १२.३० वा. आॅनलाइन अर्ज करण्यासाठी पोर्टल खुले करून देण्यात आले आहे. या शिक्षकांना २० जागांचा पसंतीक्रम देता येईल. तथापि, पसंतीक्रम दर्शविताना पोर्टलवर संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मधील शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, अशा जागा दिसणार नाहीत. जिल्हाभरातील रिक्त जागा आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकांच्या जागांवर हे शिक्षक दावा करू शकतात.२३ सप्टेंबरपर्यंत या शिक्षकांना आॅनलाइन नोंदणी करता येईल. त्यानंतर संवर्ग-१, संवर्ग-२ आणि संवर्ग- ३ यांच्या बदलीमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना २४ ते २९ सप्टेंबरदरम्यान आॅनलाइन अर्ज करता येईल. विस्थापित शिक्षकांना २० शाळांचे पसंतीक्रम दर्शविता येतील. बदलीमुळे संवर्ग-१, संवर्ग-२ आणि संवर्ग- ३ मधील शिक्षकांच्या रिक्त झालेल्या जागा तसेच रिक्त राहिलेल्या जागाही विस्थापित शिक्षकांना पोर्टलवर दिसतील. २९ किंवा ३० सप्टेंबर रोजी बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर होतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अवघड क्षेत्रासाठी उघडली ‘खिडकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:55 AM