औरंगाबाद : सुरत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महिला प्रीमिअर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादची वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगेने पहिल्या फेरीत पश्चिम बंगालच्या सम्रिधा घोषचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. ही भारतातील महिला बुद्धिबळ सर्वात मोठी व मानांकित स्पर्धा असून, या स्पर्धेतील सर्व बारा खेळाडूंना सहा लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राऊंड-रॉबिन पद्धतीने होणारी ही स्पर्धा ११ फेºयांत रंगणार आहे. या १२ खेळाडूंमधे ६ वूमन ग्रँड मास्टर, १ इंटरनॅशनल मास्टर व साक्षीसहित २ वूमन इंटरनॅशनल मास्टरचा समावेश आहे.पहिल्या फेरीत साक्षीने पांढºया सोंगट्यांसह खेळताना क्वीन पान ओपनिंगने सुरुवात केली आणि सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकीत क्वीन बिशप फाइलवर ताबा मिळवला व घोड्याच्या बदल्यात हत्ती मिळविला. ही आघाडी कायम ठेवीत तिने ५६ व्या चालीत सम्रिधाचा पराभव केला. पहिल्या फेरीअखेर साक्षीसह ओरिसाची इंटरनॅशनल मास्टर पद्मिनी राऊत, वूमन ग्रँड मास्टर किरण मनीषा मोहंती १ गुणावर असून, सहा खेळाडू अर्ध्या गुणावर आहेत. या स्पर्धेतील अव्वल चार खेळाडूंची जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद व आशियाई महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
औरंगाबादच्या साक्षीची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:54 AM