जालना : हिवाळा ऋतू आरोग्यासाठी लाभदायक असल्याने हा ऋतु सर्वांनाच आवडतो. त्यामुळे हिवाळ्यात खारीक, खोबरे, काजू, अंजीर, अक्रोड, बदाम अशा सुक्या मेव्याला मागणी असते. परंतु, यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे. दरम्यान, खारीक- खोबऱ्याच्या दरात घसरण झाली असून, काजू, अंजीरच्या जवळपास दीडपट वाढ झाली आहे.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतुंपैकी सर्वांना आवडणारा ऋतू हा हिवाळा होय. उन्हाळ्यात वारंवार पाण्यासाठी जीव व्याकूळ होतो. तसेच कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. पावसाळ्यात सततच्या रिपरिपमुळे घराबाहेरही पडणे कठीण वाटते. त्यामुळे हिवाळा ऋतु हा आरोग्यासाठी पोषक असल्याने तो सर्वांनाच मानवतो.हिवाळा ऋतु सुरु झाला की, शहरातील बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या मागणीस सुरुवात होते. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात होते. यंदाही सुकामेवा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. परंतु, नोटबंदीचा त्यावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.परिणामी, सुक्यामेव्याचा बाजार थंडच आहे. शहरातील बाजारपेठेत सध्या खारीक ६०- १०० रु. प्रति किलो, खोबरं ८०- १२०, काजू ८००- १२००, बदाम ६००- ८००, मनुके १८०- ३००, अंजीर ४००- ८००, अक्रोड ५००, डिंक २५०- ६००, गोटीगुळंबी ५००, मेथी ५०-८० रुपये प्रतिकिलो आहे. गतवर्षीच्या तुलनेत खारीकचा दर ४० रुपयांनी, खोबरं ६० ते ८० रुपयांनी घसरले आहे. तसेच मेथीही घसरली आहे. (प्रतिनिधी)
हिवाळ्यातील सुक्यामेव्याला नोटाबंदी बाधली !
By admin | Published: January 15, 2017 11:19 PM