औरंगाबाद : माणसाच्या जगण्याचा संकोच करणाऱ्या नकारात्मक प्रवृत्ती एकवटत आहेत. सत्ताधाऱ्यांची मध्ययुगीन मानसिकता वेगवेगळ्या प्रकरणांतून उघडी पडताना आपण रोजच पाहतो. कवी, लेखक, कलावंत आणि विचार करणाऱ्या प्रत्येकाला आतल्याच नाही तर बाहेरच्याही संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. लोकशाहीसोबतच मानवी मूल्यांचीही होणारी घुसमट सोसताना बुद्धी आणि मनाचा थरकाप होत आहे, अशा भावना कवयित्री अनुराधा पाटील यांनी रविवारी व्यक्त केल्या.
‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी (दि.५) सायंकाळी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मधुकरअण्णा मुळे, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉ. गणेश मोहिते, प्रा. श्रीधर नांदेडकर, डॉ. पी. विठ्ठल, कुंडलिक अतकरे आणि डॉ. दादा गोरे यांची विशेष उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील म्हणाल्या , सत्ता आणि शोषण एकत्रच नांदतात, हे माहीत आहे. पण आपल्या निलाजरेपणाला आणि कोडगेपणाला तोड नाही. परिघाबाहेरच्या माणसांची जगण्याची आत्यंतिक धडपड आणि त्यांचे संपत जाणे आपल्या खिजगणतीतही नाही. परिघाच्या आत असणाऱ्यांची परिस्थितीही वेगळी नाही. सांस्कृतिक साक्षरतेचा अभाव या सगळ्यांच्या मुळाशी आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मोहिते, प्रा. नांदेडकर आणि डॉ. पी. विठ्ठल यांनी अनुराधातार्इंच्या कवितेविषयी भाष्य केले. डॉ. मोहिते म्हणाले की, दु:ख हे अनुराधातार्इंच्या कवितेचा स्थायिभाव असून, त्यांची कविता ही स्वतंत्र चेहऱ्याची, समाजाला विचार करायला लावणारी आहे. तसेच त्यांच्या कवितेतून माणूसपणाच्या जवळ जाणारा आशावाद दिसून येतो.
प्रा. नांदेडकर म्हणाले की, भावात्मकतेची अनुपस्थिती असणाऱ्या काळात साहित्य अकादमी पुरस्कार देऊन भावात्मक कवितेचा सत्कार होणे ही आनंददायी बाब आहे. अनुराधातार्इंनी व्रतस्थ राहून निरपेक्ष, प्रांजळपणे लिखाण केले. त्यांच्या अनुभवनिष्ठेतच कवितेचे श्रेष्ठत्व आहे.अनुराधातार्इंनी कवितेचे चारित्र्य जपले असून, गुणवत्ता राखत लेखन केले आहे. आशयघन, प्रतिभासंपन्न आणि संवेदनशील ही अनुराधातार्इंच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत, असे पी. विठ्ठल यांनी नमूद केले. डॉ. दादा गोरे यांनी प्रास्ताविक केले.
खेडे हेच अनेकांचे विद्यापीठज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई असो किंवा खेड्यातील अनेक अडाणी, निरक्षर महिला असो. तिथल्या अनुभवातूनच अनेक जण शिकत जातात. त्यामुळे त्यांना वेगळे शिकण्याची गरजच नसते. कवयित्री अनुराधा पाटील याही ग्रामीण भागातून आलेल्या कवयित्री असून, त्यांच्याप्रमाणेच अनेकांसाठी खेडेगाव हेच विद्यापीठ आहे, अशा शब्दांत पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपले विचार मांडले.अनुराधातार्इंच्या रूपात मराठवाड्याला हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. ‘मागासलेला’ म्हणून मराठवाड्याच्या बाबतीत कायमच ओरड होत असली तरी कला, साहित्य, संस्कृती आणि इतिहास याबाबत मराठवाडा कधीच मागे नाही. अनुराधातार्इंचे बालपण, अनुराधातार्इंच्या आर्इंचा संघर्ष याबाबत त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. साहित्य अकादमीसारखा पारदर्शी आणि नितळ पुरस्कार दुसरा कोणताच नाही, असे सांगत त्यांनी अनुराधातार्इंना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.