औरंगाबाद: महापालिका प्रशासक म्हणून डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय मंडळींना सोबत घेऊन शहरास विकासात पुढे नेऊ अशी ग्वाही प्रशासक चौधरी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, आस्तिककुमार पांडेय यांच्या कार्यकाळात विकासाचा जो पाया रचला गेला त्यावर कळस चढविण्याचे काम यापुढे करण्यात येईल. शहराच्या गरजा ओळखून त्यावर तत्काळ काम करण्यात येईल. सोयीसुविधा देण्यात काही अडचणी असतील त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच औरंगाबादकरांना आगामी काळात सर्व सेवासुचिधा चांगल्या पद्धतीने देण्यात येतील,असेही चौधरी यावेळी म्हणाले.
महापालिकेचे नवीन प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी सोमवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. कार्यालयीन वेळेत ते न येऊ शकल्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. राज्य शासनाने महापालिकेचे प्रशासक म्हणून सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची मागील आठवड्यात बदली केली, तसेच आस्तिककुमार पाण्डेय यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. चौधरी गेल्या आठवड्यातच औरंगाबादला येणार असल्याची चर्चा होती, पण त्यांच्या जागी बदलून आलेले डॉ.राजा दयानिधी हे वेळेत आले नाहीत. त्यामुळे त्यांना पदभार घेण्यास उशीर झाला.