- दादासाहेब गलांडेपैठण ( बीड) : जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै महिन्यात अगदी मृत साठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्याप्रमाणावर आवक वाढली. यामुळे आज धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे. दरम्यान, वाढती आवक लक्षात घेऊन शून्य टक्के पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी १ वाजता १०० क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे.
पाणलोट क्षेत्रात झालेला मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वरच्या भागातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण भरल्याने जायकवाडी धरणात आवक वाढली. यामुळे जुलै महिन्यात मृतसाठ्यात असलेलले जायकवाडी धरण ऑगस्ट महिना संपतासंपता ७५.९ टक्क्याच्या पुढे गेले आहे. आता येणाऱ्या पाण्याची आवक थोडी मंदावली असून ४६ हजार ६८२ क्युसेकने पाणी धरणात येत आहे. दरम्यान, माजलगावच्या ३२ टीएमसीच्या धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून दुपारी एक वाजता शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच रात्रीतून हळूहळू पाण्याचा वेग वाढवला जाणार असल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.
जायकवाडी नाथसागर धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. धरणाची पातळी १५२२ फूट आहे. आज रोजी पाणी पातळी १५१७.६९ फूट झाली आहे. माजलगाव धरण ३२ टीएमसीचे आहे. माजलगाव धरण 0% टक्क्यावर असल्यामुळे आज दुपारी १ वाजता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.