औरंगाबाद : लग्न समारंभासाठी औरंगाबादेत आलेल्या मुंबईच्या तरुणाला मारहाण करीत गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत दोन गुन्हेगारांना मुकुंदवाडी पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या.
दीपक रमेश साबळे (वय २१) आणि उमेश गौतम गवळे (३०, रा. ब्रिजवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार संतोष आनंद जाधव (३०, रा. घाटकोपर पश्चिम, मुंबई) हे नातेवाइकांच्या लग्नासाठी औरंगाबादला आले आहेत. बुधवारी सायंकाळी ते एकटेच मुकुंदवाडी येथील भाजीमंडईत आले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पाहून आरोपी तरुण अचानक त्यांच्याजवळ आले आणि त्याच्याशी ओळख काढू लागले. यानंतर त्यांनी त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. तक्रारदार यांनी त्यांना नकार देताच आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट करीत गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. यावेळी जाधव यांनी एका हातात साखळी पकडल्याने काही भाग त्यांच्या हातात राहिला. सुमारे एक तोळ्याची साखळी हिसकावून आरोपी पसार झाले. या घटनेनंतर जाधव हे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. याचदरम्यान गस्तीवरील विशेष पथकाचे फौजदार अमोल म्हस्के, हवालदार बाबासाहेब कांबळे, शैलेंद्र अडियाल, मनोहर गिते, श्याम आढे, कैलास काकड आणि सुधाकर पाटील यांच्या पथकाला या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू केला आणि अवघ्या तासाभरात दोन्ही आरोपींच्या ब्रिजवाडी परिसरात मुसक्या आवळल्या.
============
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
दोन्ही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.