छत्रपती संभाजीनगर : महानुभाव आश्रम ते झाल्टा फाट्यापर्यंत बीड बायपासचे काम करण्यात आल्यानंतर त्या पुढील सुमारे दीड किमी अंतराचे सिमेंट काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणही अलीकडच्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. परंतु या रोडच्या दोन्ही बाजूंच्या काही काँक्रीटच्या पॅचला तडे गेले आहेत.
एक ते दोन इंचाचे हे तडे असून, आगामी काळात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता आहे. झाल्टा फाट्यापासून पुढे सोलापूर-धुळे महामार्गाच्या सर्व्हिस रोडपर्यंतच्या दीड किमीचे काम जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार संस्थेकडून करून घेण्यात आले आहे. महामार्गाच्या पुलालगत असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. तर झाल्टा फाट्यापर्यंत येणाऱ्या दिशेने देखील कमी-अधिक प्रमाणात भेगा पडल्या आहेत. बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प अभियंत्यांच्या देखरेखीत बायपासच्या सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
पुलाच्या उंचीवरूनही वादईपीसी हायब्रीड ॲन्युटी मॉडेलनुसार बायपासचे काम केले असून, त्यात तीन उड्डाणपुलांसह १७ किमी अंतराचा समावेश आहे. बायपासवरील संग्रामनगर उड्डाणपुलाची उंची व अंडरपासच्या कामाला नागरिकांनी जानेवारी २०२३ मध्ये विरोध केला होता. बायपासवर संग्रामनगर येथे बांधलेल्या पुलाच्या उंचीवरून पीडब्ल्यूडीवर आरोप झाले होते. सध्या तरी पुलाखालून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
कंत्राटदाराचा दावाजीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला २९१ कोटी व इतर ९२ कोटींच्या कामांचे कंत्राट देण्यात आले. दरम्यान, सदरील रोडचे काम करीत असताना अनेक ठिकाणी दलदलसदृश्य काही पट्टा होता. त्यामुळे रोड बांधताना त्रास झाला. येत्या आठ ते दहा दिवसांत ज्या ठिकाणी तडे गेले आहेत, तेथील काँक्रीट पॅचेसची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असा दावा कंत्राटदार संस्थेने केला.
पीडब्ल्यूडीचा दावामी रुजू होण्यापूर्वीच त्या रोडचे काम झाले आहे. अद्याप कंत्राटदाराला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलेले नसेल. पाहणी करून सूचना करण्यात येतील. तसेच तो रोड दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीच्या अटी व शर्तींमध्ये आहे. दहा वर्षांत रोड खराब झाला तरी कंत्राटदाराला काम करून द्यावेच लागेल. काँक्रीट रोडची तांत्रिक तपासणी करून ज्या भागात तडे गेले आहेत, त्याची दुरुस्ती करून घेतली जाईल.-सुनील ठाकरे, कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प