संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, ऑनलाइन सुविधेनंतरही अनेक गोष्टी ऑफलाइन कराव्या लागतात. त्यामुळे एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर जावे लागते. यात सर्वसामान्य वाहनधारक त्रस्त होऊन जातो. परिणामी, एजंटाचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हलत नाही, अशी स्थिती आहे.
औरंगाबाद आरटीओ कार्यालयाचे ऑक्टोबर २०१६मध्ये संपूर्ण संगणकीकरण झाले. राज्यातील पहिले संपूर्ण ऑनलाइन कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख झाली. नागरिकांची एजंटांकडून सुटका व्हावी, वाहनधारकांना घरबसल्या सुविधा मिळावी, कामाची गती वाढावी, यासाठी संपूर्ण कार्यालय संगणकीकृत करून घेतले. परंतु आजही एजंटराज कायम आहे. आरटीओ कार्यालयात एजंटांशिवाय कामे होतच नाहीत, हा गेल्या अनेक वर्षांचा नागरिकांचा अनुभव आहे. लर्निंग, पर्मनंट लायसन्स असो की वाहनांसंबंधी अन्य कामे, ती करण्यासाठी वाहनचालकांना शासकीय शुल्कापेक्षाच्या दुप्पट रक्कम एजंटांना द्यावी लागते.
------
या सुविधा विनाएजंट घेऊनच दाखवा
वाहन फिटनेस सर्टिफिकेट
वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार वेगवेगळे शुल्क आहे. १५ वर्षे वयोमान पूर्ण होणारे वैयक्तिक वाहन असो की अवजड, प्रवासी वाहन, त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट एजंटाशिवाय काढणे सर्वसामान्यांसाठी अशक्यच होते.
पर्मनंट लायसन्स
लर्निंग लायसन्स आजघडीला घरबसल्या काढून घेतले जात आहे. मात्र, पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी ट्रॅकवर चाचणी द्यावी लागते. एजंटांच्या माध्यमातून प्रक्रिया करून गेले तर हे लायसन्स सहज मिळते. दुचाकीच्या पर्मनंट लायसन्ससाठी ७६४ रुपये शुल्क आहे. एजंट त्यासाठी हजार ते १२०० रुपये आकारतात.
गाडी दुसऱ्याच्या नावावर करणे
गाडी दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी साडेपाचशे रुपये शुल्क लागतात. परंतु त्यासाठी काय करावे लागते, कोणती कागदपत्रे लागतात, याची वाहनचालकांना माहितीच मिळत नाही. एजंटाकडून हे कामही सहज होऊन जाते.
------
आरटीओ कार्यालयाचा भूलभुलय्या
-आरटीओ कार्यालयात वाहनधारकांना कामकाजाची माहिती होण्यासाठी प्रवेशद्वारासमोरच मोठ्या फलकावर माहिती देण्यात आली आहे.
- ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित कक्ष सहजपणे सापडत नाही. कार्यालयाला चकरा मारत वाहनधारक विचारणा करीत फिरतात.
----
१०० पेक्षा जास्त एजंटांचा गराडा
१. आरटीओ कार्यालयाच्या परिसरात आजघडीला १००पेक्षा जास्त एजंटांचा गराडा पडलेला आहे. अनेक जण कार्यालय परिसरात बस्तान मांडून आहेत.
२. आरटीओ कार्यालयाबाहेरील रस्त्याच्या दुतर्फा टेबल टाकून, चारचाकीत बसून एजंटांकडून वाहनासंबंधी कामकाज करून दिले जात आहे.
-------
एजंटाकडे गेले की झटपट आणि विनातक्रार
- एखाद्या वाहनचालकाने स्वत:हून सर्व प्रक्रिया केली तर त्यात अनेक त्रुटी काढून माघारी पाठविले जात असल्याचा अनुभव अनेकांना येतो.
- एजंटांकडे गेले की, तेच काम झटपट आणि विनातक्रार होते. एखादे कागदपत्र सोबत नसेल तरीही ते काम होऊन जाते.
- कोणते काम कोणत्या कर्मचाऱ्याकडे होते, ही बाब एजंटांना माहीत असते. त्यानुसार तिकडे गेले की काही मिनिटांतच कामे करूनही दिली जातात.
----
अडीचशे रुपये जास्त दिले तेव्हाच झाले काम
लायसन्स काढण्यासाठी एका एजंटाला एक हजार रुपये दिले. त्यासाठीचे शुल्क हे ७६४ रुपये असल्याचे नंतर कळले. पैसे जास्त गेले, पण काम झाले. हेही महत्त्वाचे आहे.
- एक वाहनचालक
----
चारचाकी वाहनाला १५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे फिटनेस करायचे आहे. कार्यालयात आलो, तर करोडीला जावे लागेल, असे सांगितले. काय प्रक्रिया आहे, हे सहज कोणी सांगितले नाही. एजंट करून देतो म्हणाला आहे.
- दुसरा वाहनचालक
------
प्रत्येक सुविधा ऑनलाइन
वाहनासंबंधी प्रत्येक सुविधा ऑनलाइन झाली आहे. कार्यालय परिसरात कामकाजासंदर्भातील माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक खिडकीवर कोणते काम होते, हे दिले आहे. त्यामुळे एजंटाकडे जाण्याची आवश्यकता नाही. नागपूर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे वाहनधारक प्रतिनिधी नेमू शकतात.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी