जयेश निरपळ
गंगापूर : व्यापाऱ्यांनी दुकानातील कामगारांसह कोरोना चाचणी करून अहवाल दुकानाच्या दर्शनी भागावर लावण्याचा आदेश प्रशासनाने दिलेला आहे; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने तालुक्यातील ३ हजार ८ आस्थापनांपैकी व ६ हजार १६४ मालक कर्मचाऱ्यांपैकी ४३ टक्के मालक कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी न करताच आपली दुकाने सुरू ठेवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव ग्रामीण भागात अधिक होता. त्यामुळे नोडल अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी ९ जूनला तालुक्यातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध शिथिल करताना सात दिवसांच्या आत दुकान मालक व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. तालुक्यात शहरी भागात ५२६ आस्थापने असून, त्यात १ हजार ५७८ कर्मचारी, तर ग्रामीण भागात २ हजार ४८२ दुकानांत ४ हजार ५८६ कर्मचारी आहेत. पैकी शहरी भागात असलेल्या दुकानांतील ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, तुलनेत ग्रामीण भाग १० टक्क्यांनी पुढे आहे. शहरी व ग्रामीण भागातील मिळून एकूण १२६० दुकाने व त्यातील २६७० म्हणजे ४३ टक्के मालक कामगारांच्या चाचण्या अद्यापही झालेल्या नाहीत. चाचण्यांशिवाय दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देऊनही व्यापाऱ्यांनी त्यास गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्यावतीनेदेखील चाचण्या न करणाऱ्या दुकान मालकांवर कारवाई झालेली नाही. तसेच त्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने तालुक्यातील अनेक आस्थापने नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. एकीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी तयारी सुरू असतांना तालुक्यातील अशा परिस्थितीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौकट
कोरोनाने २३१ जणांचे गेले प्राण
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गंगापूर तालुक्यात २८१९ रुग्ण सापडले होते. त्यापैकी ७३ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेने तर तालुक्यात कहर केला. यात जिल्ह्यात सर्वाधिक आढळलेल्या ४९२१ रुग्णांपैकी १५८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.