औरंगाबाद : ‘ज्ञानाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय ज्ञान नाही’ असा साधा सरळ हितोपदेश आज येथे विविध प्रश्नांचे उत्तर उपस्थित प्रचंड जनसमुदायाकडूनचमागता मागता केला. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गारखेडा विजयनगर येथील कारगिल मैदानावर आयोजित कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी सर्वांचीच हसून हसून पुरेवाट केली. तर मुलीसाठी ‘बाप’ काय असतो याचे वर्णन करताना त्यांच्यासह सर्वांच्याच डोळ्यात कधी अश्रू आले, हे कळलेही नाही.
दरवर्षी कडा मैदानावर होणारे हे कीर्तन यावर्षी कारगिल मैदानावर झाले आणि गर्दीचा उच्चांक मोडला गेला. पुरुष भाविकांप्रमाणेच महिला भाविकांची उपस्थिती तर लक्षणीय होती. तब्बल दीड तास समोर बसलेले भाविक महाराजांनी तल्लीन करून सोडले. ते देहभान विसरून गेले. महाराज उद्गारले, दोन तास तुम्हाला कशाची आठवण झाली काय? भाविक उद्गारले, नाही! मग हाच स्वर्ग. तुम्ही स्वर्गात होता!! ( हंशा आणि टाळ्याही)
झुंजार वैष्णव वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांच्या प्रमुख संयोजनात्वाखाली दरवर्षी इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मिळणारा प्रतिसाद वाढतच चालला आहे. डिडोरे पाटील आणि त्यांची सारी टीम या कीर्तनाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत असते.
संत नामदेवांचा अभंग.....हभप निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर यांनी संत नामदेवांचा ‘घालीन लोटांगण... वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगनभावे ओवाळीन नामा’ हा अभंग कीर्तनासाठी निवडला होता. अनेक प्रसंग रंगवत, समाजाच्या विसंगतीवर बोट ठेवत, त्यावर मार्मिक टिपणी करीत महाराज असे काही कीर्तनात रंगवून सोडतात की कीर्तन संपूच नये, असे वाटत असते.दर्डा साहेबांच्या चेह-यावरचे समाधान हीच त्यांची श्रीमंती...
स्वत: राजेंद्र दर्डा हे कीर्तनाला उपस्थित होते. भाविकांना अभिवादन करीतच ते व महाराज रात्री आठच्या सुमारास कीर्तनस्थळी पोहोचले आणि भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. सायली डिडोरे या मुलीने राजेंद्र दर्डा यांचे औक्षण केले. बबन डिडोरे पाटील यांनी त्यांचे शाल आणि पुष्पहाराने स्वागत केले. तर राजेंद्र दर्डा यांनी इंदोरीकर महाराजांचे स्वागत केले.
‘दर्डा साहेबांना शंभर वर्षांचे आयुष्य लाभो. थोड्या दिवसातच त्यांना चांगले दिवस येणार आहेत’ असा आशीर्वाद टाळ्यांच्या कडकडाटात देत महाराज म्हणाले, त्यांच्या चेह-याकडे बघा. जे समाधान दिसतंय तीच त्यांची श्रीमंती होय. (टाळ्या)