रांजणगाव फाट्यावर एकाचे डोके फोडले
वाळूज महानगर : जुन्या भांडणाच्या कारणावरुन ४३ वर्षीय प्रौढाचे डोके फोडणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद नारायण मोरे (रा. रांजणगाव) हे गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन बद्रीनाथ मुंडे (रा. रांजणगाव) याने मोरे यांना शिवीगाळ करुन दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले.
पाण्याची नासाडी थांबेना
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु आहे. यामुळे नागरी वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. या गळक्या जलवाहिनीमुळे दररोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. गळक्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सिडको प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
सूर्यवंशी नगरात अंधाराचे साम्राज्य
वाळूज महानगर : सिडको परिसरातील सूर्यवंशी नगर रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पथदिवे बंद असल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. याशिवाय टवाळखोर तरूण रात्रीच्या वेळी शतपावलीसाठी येणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
बजाज नगरात स्वच्छतेचा अभाव
वाळूज महानगर : बजाज नगरात स्वच्छतेचा अभाव असल्याने ठिकठिकाणी केरकचरा पडला आहे. या परिसरातील स्मशानभूमी रस्ता, हनुमान मंदिर परिसर, अग्निशमन कार्यालय रस्ता, मोहटादेवी मंदिर परिसर आदी ठिकाणी कचरा साचला असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. एमआयडीसी व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.