पिंप्रीराजा : औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांच्या ९ शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला करून ठार मारल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीमध्ये शेतकरी रेणुबा रांजणे राहतात. त्यांच्याकडे १४ शेळ्या व बैलजोडी असून बुधवारी पहाटे या शेळ्यांवर लांडग्याच्या कळपाने हल्ला करून ९ शेळ्या ठार केल्या, तर ३ शेळ्या गंभीर जमखी आहेत. ठार मारलेल्या शेळ्यांचे लचके नंतर कुत्र्यांनीही तोडणे सुरू केले होते. पशुवैद्यकीय अधिकारी नरवडे यांनी वैद्यकीय तपासणी करीत हा हल्ला लांडग्यांचा असल्याचा निष्कर्ष व्यक्त केला. यावेळी वन विभागाचे अधिकारी यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्यास एक दिवस उशीर झाला. पशुवैद्यकीय अधिकारी व वन विभागाने एक दिवस उशिराने पंचनामा केला. लांडग्यांच्या हल्ल्यात लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना वन विभागाने योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागात डुकरांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. महापालिका बेवारस कुत्र्यांना पकडून ग्रामीण भागात आणून सोडत आहे. अनेक गावांत जनावरांचा चावा घेऊन नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने बेवारस कुत्रे खेड्यात सोडून त्यांचे जीवन धोक्यात आणू नये तसेच वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.
लांडग्याचा हल्ला; नऊ शेळ्या ठार, तीन जखमी
By admin | Published: January 22, 2016 12:14 AM