औरंगाबाद : फेसबुकवरील महिलेशी मैत्री करण्याची किंमत सेवानिवृत्त रेक्टरला तब्बल १९ लाख १४ हजार रुपये एवढी मोठी मोजावी लागली. हे प्रकरण सायबर पोलिसांत गेल्यानंतर महिलेच्या अडून काही बापेच हे खाते चालवित असल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी जालन्यातील तीन आरोपींना अटक केली असून, त्यातील प्रत्येकी एक किराणा दुकानदार, रिक्षाचालक आणि विद्यार्थी आहे.
विजय तुळजाराम मुंगसे (३०, रा. मस्तगड, जुना जालना), सय्यद अन्सार सय्यद अख्तर (३७, रा. शिस टेकडी, मोरंडी मोहल्ला, जुना जालना) आणि संतोष विष्णू शिंदे (२१, रा. हनुमान टेकडी, मस्तगड, जुना जालना) अशी आरोपींची नावे आहेत. समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त रेक्टर श्यामलाल गंगाराम चौधरी (६८, रा. तिसगाव, पो. वळदगाव, ता. जि. औरंगाबाद) यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१९ मध्ये त्यांची फेसबुकवर स्नेहा जाधव नावाच्या महिलेशी ओळख झाली. त्यांचे मैत्रीत रूपांतर होऊन व्हाॅट्सॲपवर चॅटिंग सुरू झाले. एप्रिल २०२० मध्ये स्नेहा जाधव हिने मुलगी आजारी असल्याचे सांगत त्यांच्याकडे चार हजार रुपये मागितले. अन्सार सय्यदचा बँक अकाउंट नंबर देत त्यावर ते पैसे टाकण्याचे सांगितले. जानेवारी २०२० मध्ये स्नेहाने ते पैसे परत केले.
स्नेहाने त्यानंतर जालना येथे माझ्या सासऱ्याच्या नावे निशा कॉम्प्लेक्स असून, ते कॉम्प्लेक्स माझ्या व माझ्या जावयाच्या नावे करायचे आहे. मात्र माझ्याकडे पैसे नाहीत अशी थाप मारून फिर्यादीकडे पैसे मागितले. पुढे विविध कारणे सांगत, आमिष दाखवून त्यांना अन्सार सय्यदच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ८ लाख ३६ हजार रुपये व संतोष शिंदेच्या एसबीआय खात्यात ९ लाख २८ हजार रुपये असे सुमारे १७ लाख ६४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पुढे सतत पैशांची मागणी सुरू झाली. चौधरी यांनी नकार देताच त्यांचा मुलगा व जावयास पुण्यात जाऊन गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारा एसएमएस केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस कर्मचारी धुडकू खरे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, मन्सूर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के व छाया लांडगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना २४ तासाच्या आत पकडले.
चौकट,
महिले नाव, बोलायचे पुरुष
स्नेहा जाधव यांच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाऊंट पुरुषांनीच काढले होते. त्यांनी चौधरी यांचा मोबाइल नंबर घेऊन व्हॉट्सॲपवरही स्नेहा म्हणूनच चॅटिंग केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बाकी असल्यामुळे आराेपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी ४ सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.