फोटो क्रमांक- शामला गवारे
फोटो क्रमांक- आराध्या गवारे
--------------------------------
करोडी शिवारात मुरूम चोरी
वाळूज महानगर : करोडी शिवारातील गायरानातून मुरुमाची चोरी सुरू आहे. या गायरानातून रात्री-अपरात्री जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनांतून चोरी केली जात आहे. या अवैध मुरुम चोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून, महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. मुरुमाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांची दहशत असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कुणीही धजावत नसल्याने मुरुमाची चोरी सुरू आहे.
------------------------------
एकतानगरात स्वच्छतेचा विसर
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगरात ग्रामपंचायतीला स्वच्छतेचा विसर पडल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. या कामगार वसाहतीत ठिकठिकाणी कचरा साचला असून, गटार-नाल्या तुंबल्या आहेत. अस्वच्छतेमुळे डासांचा त्रास वाढला असून, नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी फिरकत नसल्याची ओरड नागरिकांतून केली जात आहे.
------------------------------
तिरंगा चौकात रिक्षाचालकांची दादागिरी
वाळूज महानगर : पंढरपुरातील तिरंगा चौकात रिक्षाचालक प्रवाशांशी झोंबाझोंबी करीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या चौकात जोगेश्वरी, रांजणगावकडे जाणारे प्रवासी शहर बसच्या प्रतीक्षेत थांबत असतात. मात्र रिक्षाचालक प्रवाशांना रिक्षात बसण्यासाठी आग्रह करून त्यांना ओढतच रिक्षापर्यंत घेऊन जातात. या बसथांब्यावरील रिक्षाचालकांची दादागिरी वाढतच चालल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
--------------------------------
सिडको महानगरातून विद्यार्थी बेपत्ता
वाळूज महानगर : ऑनलाइन प्रवेशाची माहिती घेऊन येतो, असे म्हणून घराबाहेर पडलेला सिडको वाळूज महानगरातील विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. प्रतीक कैलास सोनवणे (१९, रा. सिडको, वाळूज महानगर) हा १४ जानेवारीला बी.फार्मसीच्या ऑनलाइन प्रवेशाची माहिती घेऊन येतो, असे म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
------------------------