लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलीम अली सरोवरामध्ये रविवारी सकाळी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात सिडको पोलिसांना यश आले. सहा महिन्यांच्या तान्हुल्यास पाळण्यात ठेवून या मातेने घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.अंजना दत्ता वाडेकर (२७, रा. अयोध्यानगर, सिडको) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणाºयांना दिल्लीगेटच्या बाजूने सलीम अली सरोवरामध्ये अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस हेडकॉन्स्टेबल हमीद यांनी तपास सुरू केला होता. गायब झालेल्या अंजना यांचे हे प्रेत असल्याचे समोर आले. अंजना यांचे पती खाजगी विमा कंपनीत आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना पाच वर्षांची मुलगी आणि ६ महिन्यांचा मुलगा आहे. घरगुती कारणावरून अंजना आणि त्यांच्या सासरच्या लोकांमध्ये वाद होई. या वादातून दोन दिवसांपूर्वी अंजना यांनी तिच्या चिमुकल्या बाळाला पाळण्यात झोपू घातले आणि त्या घराबाहेर पडल्या व थेट सलीम अली सरोवरावर गेल्या. सरोवराच्या काठावर चप्पल काढून त्यांनी पाण्यात उडी मारून मृत्यूला कवटाळले. दुसºया दिवशी रविवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घरातून अचानक गायब झालेली अंजना रागाच्याभरात माहेरी गेली असेल, असे समजून पतीने सासुरवाडी आणि अन्य ठिकाणी तिचा शोध घेतला. सोमवारी ते पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना सलीमअली सरोवरात सापडलेला मृतदेह पाहून घ्या, असा सल्ला दिला. नातेवाइकांनी घाटीत जाऊन मृतदेह पाहिला आणि हंबरडा फोडला. अंजनाची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
तान्हुल्याला पाळण्यात सोडून तिने घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:50 AM