छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशी अल्पवयीन मुलींची तस्करी करीत पाच लाख रुपयात खरेदी-विक्री करणाऱ्या पुण्यातील डॉक्टरासह बुधवारपेठेतील एजंट महिलेला हर्सुल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आता अटक आरोपींची संख्या पाचवर पोहचली असल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातुन आणलेल्या अल्पवयीन मुलीने पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. त्यानुसार हर्सुल पोलिस ठाण्यात पोक्सो, बलात्कारासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी समीना सईद शाह, सईद मेहताब शाह या दांम्पत्यासह वाजिद इलियास शेख (सर्व रा. हर्सुल) यांना बेड्या ठोकल्या. पिडितीने पुण्यातील राणी, राणीचा पती आणि आशा शेख या तिघांनी देहविक्रीसाठी भाग पाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यानुसार निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, उपनिरीक्षक सुनील चव्हाण, हवालदार असिफिया पटेल, नाईक शिंदे यांच्या पथकाने पुणे गाठले. पुण्यातुन मुळव्याध आयुर्वेदिक डॉक्टर प्रशांत प्रतुश रॉय (रा. सासवड) यास ताब्यात घेतले. त्याची पत्नी राणी पोलिसांचा सुगावा लागताच फरार झाली. त्याचवेळी पोलिसांनी बुधवार पेठेतुन मुख्य एजंट आशा हसन शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनाही न्यायालयता हजर केले असता, २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मुंजर केली. ही कारवाई निरीक्षक पोतदार, उपनिरीक्षक खिल्लारे, चव्हाण, कृष्णा घायाळ, हवालदार पटेल, कोलते, डकले, हंबिर, शिंदे, दहिफळे, गुसिंगे, महाजन यांच्या पथकाने केली.
काय आहे प्रकरण
बांगलादेशात राहणाऱ्या १६ वर्षिय पीडितेला एका महिलेने भारतात २० हजार रुपये महिन्यांची नोकरीचे अमिष दाखवून एजंटामार्फत कोलकाता येथे आणले. तेथून एका दलालाने पीडितेला आशा शेख या महिलेला पाच लाखात विकले. आशाने तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानंतर फरार आरोपी राणी व तिचा डॉक्टर पती प्रशांत याने १७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरातील आरोपी दांम्पत्य समीना व सईद शहा यांच्या ताब्यात दिले. पीडितेकडून देहव्यापार करून घेतल्यानंतरही पैसे न दिल्यामुळे तिने फेसबुकवरुन वडीलांशी संपर्क केल्यानंतर पोलिस आयुक्तालय गाठले होते.