वाळूज महानगर : वडगावातून ८ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
निशा लक्ष्मण डंबाळे (२१, रा. सलामपुरेनगर, वडगाव) ही महिला २१ डिसेंबरला दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ८ महिन्यांचा मुलगा रोशन यास सोबत घेऊन घरातून निघून गेली. तिचा पती लक्ष्मण डंबाळे यांनी सर्वत्र शोध घेतला. शेवटी पत्नी मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली.
फोटो क्रमांक- निशा व रोशन
---------------------------------
मोहटादेवी रोडवर कचऱ्याचे ढिगारे
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी ते तीसगाव-सिडकोकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या कचऱ्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरत असून, मोकाट जनावरांचा उपद्रवही वाढला आहे. भाजीमंडईतील टाकाऊ भाजीपाला विक्रेते या रस्त्याच्या कडेला फेकून देतात. लगतच्या नागरी वसाहतीतील नागरिकही पॉलिथिनच्या पिशव्यांत कचरा भरून या ठिकाणी आणून टाकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.
---------------------
महाराणा प्रताप चौकात गतिरोधक बसवा
वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या मुख्य चौकातून दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारक सुसाट वाहने चालवत असतात. मुख्य बाजारपेठ या चौकात असून, ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अपघाताच्या घटनाही सतत घडत असतात. या चौकात गतिरोधक उभारण्याची मागणी सुजय काळे, अविनाश साळुंके, लक्ष्मण पावलस आदींनी केली.
---------------------------
वाळूजला बाजारात मोकाट जनावरांचा संचार
वाळूज महानगर : वाळूजच्या सोमवार आठवडी बाजारात मोकाट जनावरांना धुमाकूळ सुरू असल्यामुळे विक्रेते व नागरिकांची गैरसोय होते. या मोकाट जनावरांना हाकलल्याने ते सैरावैरा पळतात. जनावरे मोकाट सोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------
अयोध्यानगरात दत्त जन्मोत्सव
वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर परिसरातील अयोध्यानगरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा होत आहे. श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंगळवारी (दि.२९) श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानंतर सायंकाळी महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल.
---------------------
वाळूजला ट्रकच्या धडकेने दुभाजक तुटले
वाळूज महानगर : वाळूजला वाळूची वाहतूक करणारा हायवा ट्रक दुभाजकावर धडकल्याने दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास हायवा ट्रक दुभाजकावर जाऊन धडकला होता. त्यामुळे दुभाजक तुटले असून, अंधाराचा फायदा घेऊन हायवा चालक ट्रकसह पसार झाला आहे. दुभाजकाचा मलबा रस्त्यावर पडल्याने रहदारीस अडथळा होत असल्याने पोलिसांनी हा मलबा हटविला.
------------------------